(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : राज्यात पुढील दोन दिवस पावसाची उघडीप, तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. पण स्वच्छ सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मागील दोन ते तीन दिवसात झालेल्या पावसामुळं विदर्भातील काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. पण स्वच्छ सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी दिली आहे.
राज्यात उघडीपीची शक्यता तर कोकणात पावसाचा अंदाज
कोकण वगळता आजपासून (18 ऑगस्ट) संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. परंतू, स्वच्छ सूर्यप्रकाश व पूर्णतः उघडीपीची शक्यता कमीच असल्याची माहिती यावेळी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं नद्या आणि कॅनॉल पात्रातील सततचा विसर्ग तसाच कायम ठेवावा लागणार आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
विदर्भातील 10 जिल्ह्यात दोन दिवसाच्या उघडीपीनंतर शुक्रवार (19 ऑगस्ट ) पासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती यावेळी माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात भाग बदलत विखुरलेल्या क्षेत्रात मध्यम तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ हलक्या पावसाची शक्यता पुढील आठवडाभर जाणवेल, अशी माहितीही यावेळी खुळे यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभर व रात्री संपूर्ण गुजराथ राज्य आणि दक्षिण राजस्थानमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारपासून बद्री-केदार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच गया, जगन्नाथ-पुरी, कोलकातामधील पर्यटन क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
सध्या राज्यात काही ठिकाणी रिमझीम पाऊस
सध्या राज्याच्या काही भागात रिमझीम पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळं काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना देखील खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडं मुंबईसह परिसरात देखील रिमझीम पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या: