(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kharif Crop : यंदा खरीपाच्या पेरणीत घट, उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता, तज्ज्ञांची माहिती
यावर्षी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळं खरीपाच्या पिक (Kharif Crop) उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी (Experts)वर्तवली आहे.
Kharif Crop : सध्या पेरणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशात ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाल आहे त्या ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अद्यापही काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत. दरम्यान, यावर्षी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळं खरीपाच्या पिक (Kharif Crop) उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी (Experts)वर्तवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भात, उडीद आणि तूर लागवडीखालील क्षेत्र घटलं आहे. त्यामुळं खरीपाच्या पिक उत्पादन घट होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी पावसामुळं पिकांचे नुकसान तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी
मागील वर्षीचा विचार केला तर यंदा पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे. भात, उडीद आणि तूर लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 52.98 टक्के कमी आहे. अनियमित पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पावसाचे कमी प्रमाण असल्यामुळं पेरणीत घट झाली आहे. पेरणीची व्याप्ती कमी होण्यास मजुरांच्या कमतरतेची ही देखील समस्या आहे. कारण उत्पादन आणि बांधकाम यासारख्या श्रम-केंद्रित क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे शहरी भागात स्थलांतर होताना दिसत असल्याचे अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या पेरणी क्षेत्रापेक्षा खरीपाचे एकरी क्षेत्र कमी राहण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, पेरणी क्षेत्रात 52.98 टक्क्यांची तूट आहे.
भाताच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट
भाताच्या लागवडीत 13 टक्क्यांची घट झाली आहे. तर तूरच्या बाबतीत 11.67 टक्क्यांची, तर उडदाच्या पेरणी क्षेत्रात 4.57 टक्क्यांची घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,आत्तापर्यंत देशात 274.30 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 314.14 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. यावर्षी मात्र, यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे. सर्वात मोठे धान उत्पादक राज्य असलेल्या पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कमी भाताचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. दरम्यान, 8 ऑगस्टपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशात 36 टक्के पावसाची कमतरता आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात 43 टक्के पावसाची कमतरता आहे.
महाराष्ट्रातही खरीप पिकांना फटका
महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख कडधान्य उत्पादक प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतात पाणी साचलं आहे. याचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तूर लागवडीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असताना, राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळं पिकांच नुकसान झालं आहे. मूग आणि उडीदाचे पिक योग्य येण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक आहे. ही पिकं हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: