बीएचआर घोटळाप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने, लवकरच नावे जाहीर करणार : एकनाथ खडसे
बीएचआर घोटाळ्याची चौकशी नव्याने सुरू करण्यात आली असून 150 हून अधिक पोलिसांच्या पथकाने कारवाई करताना दोन ट्रक भर पुरावे गोळा केले असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
जळगाव : बीएचआर घोटाळ्याच्या संदर्भात माझ्याकडे काही रेकॉर्ड आहे ते मी पोलिसांना दिले आहे. पोलीस चांगला तपास करीत असल्याने ते जाहीर करावे असं मला वाटत नाही,कारण अस केलं तर पोलीस तपासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. येत्या काही दिवसात पोलीस त्यातील सहभागी असलेल्याची नावे जाहीर करतील, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने काही संशयित भूमिगत झाले असल्याचं देखील खडसे यांनी म्हटलं आहे .
खडसे म्हणाले, बी एच आर घोटाळा प्रकरणात केंद्राच्या आदेशानंतरही राज्यातील काही नेत्यांचा समावेश असल्याने राज्य सरकारच्यावतीने चौकशी कामी चालढकल करण्यात आली आहे. ही चौकशी होऊ दिली नाही, मात्र सरकार बदलल्यानंतर ही चौकशी नव्याने सुरू करण्यात आली असून 150 हून अधिक पोलिसांच्या पथकाने कारवाई करताना दोन ट्रक भर पुरावे गोळा केले आहेत. या घोटाळ्याच्या व्याप्तीचा विचार करता कागदपत्रे पूर्ण नसतांना ही काहींना दहा दहा कोटी रुपयांची कर्ज दिली आहेत. काही ठिकाणी बनावट कागदपत्रे बनवले आहे,त्या साठी बनावट शिक्के वापरले आहेत. आमदारांचे लेटर हेड सापडले आहेत. बोगस कागदपत्र देऊन माजी आमदार खासदार यांच्यासह अनेकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतली आहेत. गिरीश महाजन यांचं लेटर हेड सुनील झंवर यांच्या घरात पोलिसांच्या कारवाईत आढळून आले होते. सुनील झंवर हे गिरीश महाजन यांचे मित्र असल्याने काही कामानिमित्ताने ते त्यांच्याकडे राहिले असेल मात्र लेटर हेड सापडले याचा अर्थ गिरीश महाजन यांच्या या घोटाळ्यात समावेश आहे असं म्हणता येणार नाही.
गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बी एच आर च्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप जामनेर चे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केलेला असला तरी गिरीश महाजन यांनी या जमिनी खरेदी केल्याबाबत माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत ,अस सांगून खडसे यांनी गिरीश महाजन यांची पाठराखण केली.
बी एच आर घोटाळ्याच्या संदर्भात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती या टीकेला उत्तर देतांना खडसे यांनी म्हटलं आहे की, प्रवीण दरेकर हे राज्याचे जबाबदार विरोधी पक्ष नेते आहेत अभ्यासू नेते आहेत. या घटनेचा अभ्यास करून त्यांनी बोललं असत तर बरं झालं असतं, कोणताही अभ्यास न करता त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत मला त्यांची कीव येते अशा शब्दात खडसे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
बी एच आर घोटाळ्याच्या संदर्भात 2018 पासून पाठपुरावा करीत आहोत. यातील घोटाळ्याच्या बाबत आपण केंद्र सरकारमधील राधा मोहन सिंग यांना हे सर्व समजावून सांगितले होते. त्यांनीही या घटनेची गंभीरता पाहून ईओडब्लू कडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र तत्कालीन राज्य सरकारने हे आदेश पाळलेले नाहीत मात्र आता सरकार बदलल्या नंतर ही चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आकसपोटी ही कारवाई केलेली नाही तर पूर्वीचीच कारवाई आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे
कागद पत्रांचा विचार केला तर हा अकराशे कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याच अंदाज आहे. गिरीश महाजन यांनी मात्र बीएचआरच्या जमिनीची केवळ दहा ते वीस कोटींची विक्री झाली आहे त्यामुळे खडसे सांगत असलेली रकम ही खूपच जास्तीची असल्याच गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना खडसे यांनी म्हटलं आहे की, बी एच आर संस्थेची कागदपत्र आणि मालमत्ता पाहून मी हा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. मात्र ही रक्कम कमी असली तरी यामध्ये घोटाळा झाला आहे हे महत्वाचे आहे. या घोटाळ्यात केवळ भाजपाचेच लोक आहेत असं नाही तर कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षांचे लोक असल्याच खडसे यांनी म्हटलं आहे. घोटाळ्याची चौकशी आता पोलीस करीत आहेत त्यात काय समोर येईल ते येईन मात्र ठेवीदारांचे अडकलेले पैसे त्यांना परत मिळायला हवे आहे. अडकलेले पैसे मिळत नसेल तर त्यासाठी सरकारने मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेसाठी जो फॉर्म्युला वापरला होता त्याचा वापर करावा किंवा या संस्थेच्या प्रॉपर्टी विकून त्यातून आलेल्या पैशातून ठेवीदारांचे पैसे द्यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याच खडसे यांनी म्हटलं आहे.
BHR Office Sealed | जळगावातील 'बीएचआर' पतसंस्थेचं मुख्य कार्यालय सील, पुणे पोलिसांची कारवाई