पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते वर्षभरापूर्वीच नौदल दिनाचे औचित्य साधून या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, समुद्रकिनारी असलेला हा पुतळा अचानक कोसळल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा पुतळा नेमका कोणी उभारला, कोणाला टेंडर देण्यात आलं, पुतळ्याचा दर्जा कसा होता, पुतळ्याचा नीट अभ्यास केला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, ह्या पुतळा उभारणीचं कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील व्यक्तीला देण्या आलं होतं, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. त्यामुळे, राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता, ह्या पुतळ्याची माहिती देताना, हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचं कामही त्यांच्याकडे होते, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग येथील शिवरायांचा (Shivaji maharaj) पुतळा कोसळल्यानंतर राजकीय नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच तोडफोड केली आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉन्ट्रॅक्टर हा ठाणे जिल्ह्यातील असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले. आता, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, हा पुतळा नौदलानेच उभारला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्र किनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेली हलगर्जी सहन केली जाणार नाही. तातडीनं यावर कारवाई करून येत्या दोन महिन्यांत पुन्हा शिवरायांचा पुतळा बसविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.