Sadabhau Khot : सदाभाऊंच्या नेतृत्वात उद्यापासून 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' अभियान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार चर्चा
राज्यातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात येणार आहे.
Sadabhau Khot : सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर, युवकांसमोर, शेतमजुरांसमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली 'जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात 29 एप्रिल म्हणजे उद्यापासून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. या अभियानामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सामील होणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतू राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप करत आहे. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ, अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, शेतमाल हमीभाव या समस्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात एबीपी माझा डीजिटलने आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत विरुद्ध इंडिया अशी लढाई सुरु आहे. आमची लढाई ही आता इंडियावाल्यांशी असल्याचे खोत म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सध्या शेतकऱ्यांसमोर काय समस्या आहेत हे जाणून घेणार आहोत. युवकांचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, व्यावसायिकांचे प्रश्न काय आहेत यासंबंधीची माहिती घेणार आहोत. कोरोनाच्या काळात शेतकरी, शेतमजुर, उद्योजक, तरुण याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे खोत म्हणाले. राज्याचे राजकारण पाहता हे विषय अडगळीतच पडले आहेत. स्पर्धा परीक्षा वेळेत झाल्या नाहीत. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळे झाले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुण आत्महत्या करत आहेत. याकडे सरकारचे लक्ष नसल्याचे खोत म्हणाले. पिकासानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. फळबागा भाजीपाला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न , सध्या अनेक ठिकाणी ऊस शिल्लक राहण्याची स्थिती निर्माण झाल्याचे खोत म्हणाले.
दरम्यान, या अभियानात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बोलावले तरी मी त्यांच्याजवळ जाणार आहे. तसेच भाजपचे आमदार, घटक पक्षाचे कार्यकर्ते यांच्याबरोबर देखील चर्चा करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या अभियानात शेतकऱ्यांचे, तरुणांचे, व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दिवसातून तीन चार बैठका घेणे, तसेच पत्रकार परिषदा घेणार आहोत. तसेच दिवसातून एक दोन गावात जाहीर सभा घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. 23 मे पर्यंत हे अभियान चालणार आहे. 23 मे ला तुळजापुरात तुळजा भवानीचे दर्शन घेऊन घोषवारा मांडण्यात येणार आहे. तसेच या अभियानाचा समारोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात होणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Agriculture Award : 198 शेतकऱ्यांचा कृषी पुरस्कारांनी होणार सन्मान, 2 मे ला नाशिकमध्ये राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा
- Onion Price : नाफेडला 10 ते 12 रुपये किलोनं कांद्याची विक्री करु नका, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांना आवाहन