Belgaum : मद्यपान करून त्रास देणाऱ्या प्राध्यापकाला महिला अतिथी प्राध्यापिकांनी महाविद्यालयातचं चोपलं
Belgaum : बेळगावमध्ये मद्यधुंद प्राध्यापकाला महिला प्राध्यापिकांनी चांगलाच चोप दिला आहे.
Belgaum : बेळगावातील (Belgaum) सरदार पदवी पूर्व प्राथमिक महाविद्यालयातील (Sardar Degree Pre-Primary College) महिला अतिथी प्राध्यापकांना त्रास देणाऱ्या प्राध्यापकाला संतापलेल्या महिला अतिथी प्राध्यापिकांनी एकत्र जमून चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी महिला प्राध्यापिकांनी महिला पोलीस स्थानकात तक्रारदेखील नोंदवली आहे.
सरदार पदवी पूर्व प्राथमिक महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा प्राध्यापक अमित बसवमुर्ती (Amit Basavamurthy) हा महाविद्यालयात मद्य प्राशन करून येतो. महिला प्राध्यापिकांना अर्वाच्य भाषेत बोलणे, त्यांच्याकडे बघून हातवारे करणे असे प्रकार प्राध्यापक अमित बसवमुर्ती हा करत होता.
स्टाफ रुममध्ये जावून असभ्य वर्तन करणे असे प्रकार अमित बसवमुर्ती करत होता. मंगळवारी तर या प्राध्यापकाने एका महिला प्राध्यापिकेच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला प्राध्यापिकांनी प्राध्यापक अमित बसवमूर्ती याला पकडून बेदम चोप दिला आणि त्याला अक्षरश तुडवून काढले.
दरम्यान अन्य कर्मचाऱ्यांनी मध्ये पडून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिला प्राध्यापिकांनी त्याला खाली पाडून चांगलेच चोपून काढले. नंतर तीन महिला प्राध्यापिकांनी कॅम्प येथील महिला पोलिस स्थानकात प्रा.अमित बसवमूर्ती यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. महिला प्राध्यापिकांना त्रास देणाऱ्या अमित बसवमूर्ती यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी महिला प्राध्यापिकांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच संबंधित प्राध्यपकाविरोधात नेमकी कोणती कारवाई होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या