Pandharpur Crime : जिममध्ये महिला आणि मुलींची छेडछाड, ट्रेनर गजाआड
पंढरपुरात जिम ट्रेनरचे प्रताप समोर आले आहेत. जिममध्ये येणाऱ्या महिला आणि मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी ट्रेनरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पंढरपूर : पंढरपूरमधील एका जिम प्रशिक्षकाकडून जीम सरावाच्या नावाखाली अनेक महिला आणि मुलींची लैंगिक छळवणूक केल्याचं उघड झालं आहे. यानंतर पोलिसांनी या रंगील्या जिम प्रशिक्षकाला अटक केली आहे. न्यायालयाने जिम ट्रेनरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंढरपूर शहरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीने आपली शारीरीक तंदुरुस्ती चांगली राहावी म्हणून एका नामांकित जिममध्ये 18 जानेवारी 2022 रोजी पासून जाणं सुरु केलं. त्यांनी जिममध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जीममध्ये दिले होते. सुरुवातीला जिममधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाडने डाएटची माहिती देण्यासाठी महिलेच्या मोबाईलवर फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर श्रीकांत गायकवाडने तिच्या मोबाईल फोनवर कॉल करुन तसंच व्हॉट्सअॅप मेसेज करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला. वैतागून महिलेने ज्या काही सूचना द्यायच्या असतील त्या आम्ही जिममध्ये आल्यावर देत जा असं सुनावलं. तरी देखील श्रीकांत गायकवाड हा वेळी अवेळी तिच्या मोबाईलवर कॉल करणे, व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करणे, इन्टाग्राम चॅटिंग, फेसबुक चॅटिंग, स्नॅपचॅट अशाप्रकारे विविध प्लॅटफॉर्मवर चॅट करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.
या विवाहित महिलेचा पती ज्यावेळी कामानिमित्त बाहेर गेला असताना ती एकटी जिममध्ये जात होती. त्यावेळी त्या संधीचा फायदा घेऊन श्रीकांत गायकवाड हा तिच्याकडे वाईट नजरेने पाहणं तसंच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करुन वाईट हेतूने तिच्या शरीराला स्पर्श करणे असे प्रकार करत होता. या कृत्याबाबत महिलेने तिच्या पतीला सांगितलं आणि दोघांनी जिम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आरोपीने संबंधित स्त्रीला व्हॉट्सअॅप चॅटिंग, फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी वेळोवेळी दिली.
अखेर या ट्रेनरच्या त्रासाला वैतागलेल्या या महिलेने पंढरपूर शहर निर्भया पथकाशी संपर्क साधत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने जिम ट्रेनर श्रीकांत राजू गायकवाड याच्याविरोधात कलम 354, 354 (अ), 354 (क), 354(ड) आणि 506 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. सध्या न्यायालयाच्या आदेशानंतर हा जिम ट्रेनर पोलीस कोठडीमध्ये आहे. या ट्रेनरकडून अनेक मुली आणि महिलांना त्रास झाल्याची माहिती आता पोलीस तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी या ट्रेनरच्या मोबाईलची तपासणी सुरु केली आहे. महिला आणि मुलींशी गोड बोलून, त्यांची स्तुती करुन आणि त्यांच्याशी मोबाईलद्वारे चॅटिंग करुन त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या आरोपीविरोधात ज्या मुली आणि महिलांची तक्रार असेल त्यांनी निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम यांनी केलं आहे.