एक्स्प्लोर
Advertisement
मंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात!
देशविदेशात प्रसिद्ध झालेल्या मंगळवेढ्यातील कोवळ्या ज्वारीच्या हुरडा पार्ट्यांना आता सुरुवात झाली असून गावोगावच्या शिवारात आता या हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत.
पंढरपूर : देशविदेशात प्रसिद्ध झालेल्या मंगळवेढ्यातील कोवळ्या ज्वारीच्या हुरडा पार्ट्यांना आता सुरुवात झाली असून गावोगावच्या शिवारात आता या हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. मंगळवेढ्यातील या स्पेशल हुरडा पार्ट्यांची खासियत असते ती या ठिकाणी असलेल्या मालदांडी, कुचकुची, दूध मोगरा, सुरती अशा विविध प्रकारच्या हुरड्यासाठी.
ज्वारीचे पीक राज्यभरातील अनेक भागात घेतले जाते. मात्र, मंगळवेढ्याच्या ज्वारीची चवच न्यारी आहे. नजर पडेल तिथे चारीबाजूला पसरलेली सपाट काळी जमीन, त्याला कोरड्या हवामानाची जोड आणि वर्षभरात कधीतरी पडणारा एखादा दुसरा पाऊस, यामुळे केवळ हवेवर येणाऱ्या नैसर्गिक ज्वारीला एक वेगळीच चव असते. यामुळेच केंद्र सरकारने या ज्वारीला थेट जीआय मानांकन दिलं आहे. आता हीच नैसर्गिक ज्वारी देशविदेशात चढ्या भावाने विकली जाऊ लागली आहे . या भागातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या काळ्या मातीत सोने सापडत असल्याने खऱ्या अर्थाने सोन्याचे कण या ज्वारीत उतरत असल्याने हे पीक खाणाऱ्याला दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही. असं म्हटलं जातं.
मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या प्रसिद्ध हुरड्याला व्यावसायिक स्वरुप न देता त्यांनी आपल्या आप्तेष्टांसाठी विविध प्रकारच्या हुरड्याची लागवड करतात. एकदा पेरणी केली की ना त्याला कोणत्या खताची गरज पडते ना फवारणीची. असे हे पीक बहरु लागले कि थेट हुरड्यालाच रानात येण्याची पद्धत या परिसरात आहे. या काळ्या जमिनीला धरच नसल्याने या रानात ना विहीर घेता येते ना बोअर. एखादा पाऊस पडला कि ज्वारीचे ताटवे वाऱ्यावर डोलू लागतात.
संक्रांतीनंतर या हुरड्याला खरी सुरुवात होते आणि पुढील पंधरा दिवस प्रत्येक शिवारात दिवसातून दोन वेळेला या हुरडा पार्ट्या रंगतात .
ज्वारीच्या ताटामधून वाट काढत एखाद्या डेरेदार झाडाखाली हुरडा पार्टीसाठी मंडळी जमा होतात. महिलावर्ग घरी बनविलेले काळे तिखट, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या, मिरचीचे ठेचे आणि गुळाचे खडे पिशव्यांतून भरुन रानात येतात. सोबतीला बोरे, हरभऱ्याचा ढाळा, ऊस, शेंदाड, वाळकं असा रानमेव्यावर ताव मारण्यास सुरुवात होते. रानात लहानसा खड्डा घेऊन त्यात गोवऱ्या टाकून आर तयार केलेली असते. शेतातून निवडून आणलेली कोवळी कणसे या आरात घालून भाजण्यास सुरुवात होते. शेजारी बसलेले दोघे हातावर ही गरम गरम कणसे चोळून हुरडा तयार करतात. फास्ट फूडच्या जमान्यात हा कोवळा हुरडा मात्र तरुणाईला सारं काही विसरायला लावतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement