ठाकरे गटाचे आमदार मोठा गौप्यस्फोट करणार? माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण, भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र (emotional letter) लिहलं आहे.
Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र (emotional letter) लिहलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव हे उद्या (10 मार्च) सकाळी 11 वाजता चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर भास्कर जाधव प्रकाश टाकणार आहेत. मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये कार्यकर्त्यांना आपली भूमिका भास्कर जाधव पटवून देऊन मनमोकळे करणार असल्याचं या पत्रातून त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भास्कर जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटते. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात असे भास्कर जाधवांनी पत्रात म्हटलं आहे.
शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही
तुम्ही सर्वांनी मला साथ दिली आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रुपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळं मी यशाची अनेक शिखर पार करु शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय.
कोणत्याही दबावाला बळी न पडता खंबीरपणे उद्धवसाहेबांच्या मागे उभा
आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरुन जाहीरपणे केली जात असल्याचे जाधव म्हणाले. अशातच 40 वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते.
शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचाय
मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया. मी आपली वाट पाहतोय..!! असं या पत्रात भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: