(Source: ECI/ABP News/ABP Majha)
22 January Headlines: अयोध्येत आज कुस्ती महासंघाची बैठक, पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा
भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारणीची बैठक अयोध्येत होणार आहे, पण त्यासाठी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे उपस्थित राहणार नाहीत.
मुंबई: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. त्या आरोपांची आता चौकशी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बैठक होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सहभागी होणार नाहीत.
अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची बैठक
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केल्यानंतर दिल्लीतील वातावरण तापल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बैठक होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सहभागी होणार नाहीत.
नांदेडच्या सीमावर्ती भागात तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची बैठक
नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षांच्या आमदार, खासदारांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या आज भारत राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदारांसोबत सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहेत. दोन खासदार आणि तीन आमदार या बैठकीसाठी येणार आहेत.
पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा
पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तो डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचेल. या मोर्चात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या, धनंजय देसाई यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक असे सर्व नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत.
अमरावतीमध्ये शंकरपाट स्पर्धा
बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली आहे. या उत्साहात बहार आणण्यासाठी बहिरम परिसरात आमदार बच्चू कडू यांच्याकडून शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान हे शंकरपट होत असून यात मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली असून तळेगाव दशासर शंकरपटात सहभागी झालेल्या बैलजोड्यासह राज्यभरातुन तसेच शेजारच्या मध्यप्रदेश राज्यामधूनही स्पर्धक दाखल झालेत.
अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीची सभा
अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सायंकाळी 5:00 वाजता हिंदू राष्ट्र-जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रोफेसर चौक येथील जॉगिंग पार्क येथे ही सभा होणार असून याला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव, सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि रागेश्री देशपांडे या सभेत बोलणार आहेत.