टाटा मोटर्सने पुरवल्या बेस्टला 26 पर्यावरणपूरक ई-बसेस, 'फेम टू' उपक्रमांतर्गत सर्वात मोठी ऑर्डर
भारत सरकारच्या 'फेम टू' उपक्रमांतर्गत बेस्टने दिलेल्या 340 इलेक्ट्रिक बसेसच्या मोठ्या ऑर्डरचा एक भाग आज डिलिव्हर करण्यात आला. प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळेल आणि बेस्टसाठी त्या चालवण्याचा खर्च किमान स्तरावर राहील, तसेच प्रदूषणाचा प्रश्नही सुटेल याची काळजी घेऊन या बसेस तयार करण्यात आल्या आहेत.
मुंबई: टाटा मोटर्सने आज आपले बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टसोबतचे नाते अधिक दृढ करत 26 अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसची डिलिव्हरी केली. या डिलिव्हरीसह बेस्टला इलेक्ट्रिक बससेवा देणा-या पहिल्या ग्रॉस कॉस्ट काँट्रॅक्टची सुरुवात झाली. भारत सरकारच्या फेम टू उपक्रमांतर्गत बेस्टने दिलेल्या 340 इलेक्ट्रिक बसेसच्या मोठ्या ऑर्डरचा एक भाग आज डिलिव्हर करण्यात आला. उर्वरित बसेसही वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने डिलिव्हर केल्या जाणार आहेत.
या इलेक्ट्रिक बसेसना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे झालेल्या एका समारंभात हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र सरकार, बेस्ट आणि टाटा मोटर्सचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
‘वन टाटा’ या अनोख्या उपक्रमांतर्गत कंपनी आपल्या समूहातील विविध कंपन्यांच्या खास कौशल्यांचा लाभ घेत आहे. वीजपुरवठ्यासह सर्व अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम विद्युत सुविधा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन टाटा पॉवर यात योगदान देत आहे. बस चार्जिंगच्या संपूर्ण आस्थापनाची जबाबदारीही टाटा पॉवरच उचलणार आहे. टाटा ऑटो कम्पोनंट्स ही कंपनीही या उपक्रमाखाली टाटा मोटर्सला निवडक घटकांसाठी सहयोग, डिझाइन, विकास, सोर्सिंग आणि पुरवठा करणार आहे. इलेक्ट्रिक बसेस टाटा मोटर्सने नवीनतम उत्पादन तंत्रज्ञान वापरून पूर्णपणे देशीय स्तरावर विकसित केल्या आहेत. प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळेल आणि बेस्टसाठी त्या चालवण्याचा खर्च किमान स्तरावर राहील, याची काळजी घेऊन टाटा कंपनीतर्फे या बसेस तयार करण्यात आल्या आहेत.
मुंबईकरांचा आराम व सोय ध्यानात घेऊन या बसेस खास डिझाइन करण्यात आल्या आहेत. यामध्ये विकलांग प्रवेशांसाठी “लिफ्ट मेकॅनिझम”देखील आहे. या 25 आसनी टाटा अल्ट्रा अर्बन एसी इलेक्ट्रीक बसेस चालकाच्या व प्रवाशांच्या आरामासाठी प्रगत सुविधांनी युक्त आहेत. टाटा मोटर्सने हिमाचल प्रदेश, चंडीगढ, आसाम व महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये बसेसच्या चाचण्या घेऊन विविध भूप्रदेशांतील कामगिरी तपासून बघितली आहे.
टाटा मोटर्सने फेम वन उपक्रमांतर्गत आतापर्यंत भारतातील 5 शहरांमध्ये 215 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे. या बसेसना एसटीयू व प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. फेम वन अंतर्गत आलेल्या निविदांसह टाटा मोटर्सला अनेक राज्यांमधील परिवहन यंत्रणांकडून फेम फेज टू खाली ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. यांमध्ये एजेएलकडून 60 बसेसची ऑर्डर, जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडची 100 बसेसची ऑर्डर आणि मुंबईतील बेस्टची 300 बसेसची ऑर्डर यांचा समावेश होतो. याशिवाय, टाटा मोटर्सने एमएमआरडीएला 25 हायब्रिड बसेस डिलिव्हर केल्या आहेत. या भारतातील पहिल्या खास विकलांग व्यक्तींसाठी तयार केलेल्या बसेस आहेत.
महत्वाच्या बातम्या: