Talathi : गैरसमज आणि अज्ञान? तलाठी भरती गुणांचा गोंधळ केवळ गैरसमजूतीतून घडल्याचा महसूल विभागाचा खुलासा, वाचा नेमकं कारण
Talathi Bharti Exam : या आधी पेपर फुटल्यामुळे तलाठी भरती परीक्षा चांगलीच चर्चेत आली आहे. आता निकालानंतरही वाद सुरूच असल्याचं दिसतंय.
मुंबई: तलाठी भरती प्रक्रियेमध्ये 48 उमेदवारांना 200 पेक्षा अधिकचे गुण मिळाले आहेत. 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? हा मोठा गैरप्रकार आहे, भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचे आरोप या परीक्षेची संबंधित (Talathi Bharti Exam) असलेल्या मंडळींनी केले आहेत. सर्वच माध्यमात त्याबद्दल बातम्या प्रकाशित झाल्यात. काही आमदार, काही मंत्र्यांनीसुद्धा हा गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात असा कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ गैरसमजुतीतून, अज्ञानातून घडलं आहे असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. परीक्षा निकाल रद्द करू नये अशी मागणी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा 3 भागात आणि 57 सत्रामध्ये घेण्यात आली आहे. या परीक्षेस महाराष्ट्र भरातून तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले. 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. पण निकाल जाहीर झाला आणि एकच गोंधळ उडाला.
गुणांचे सामान्यीकरण केल्याने हे घडलं
या आधी झालेले घोळ पाहून या वेळेसची तलाठी परिक्षा टीसीएस या कंपनीने घेतली. परीक्षेनंतर उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान केले आहे. टीसीएसनं 57 प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया केली आहे. हीच प्रक्रिया कोणाला कळली नाही.
सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण शासकीय वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आले. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट होते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त झालेत. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.
परीक्षेच्या निकालानंतर संपूर्ण परीक्षाच रद्द करा अशी मागणी होत आहे. त्यामुळे मोठ्या अभ्यासानंतर परीक्षा पास झालेले उमेदवार निराश झाले आहेत. कोणत्याही परिस्थित परिक्षा रद्द करू नये अशा विनवण्या करत आहेत.
सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल तेव्हा आरक्षण आणि सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल. परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही. ही परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात झाली आहे हेही महत्त्वाचे. बेरोजगारी पाहता मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात. त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भागच आहे.
ही बातमी वाचा: