Supriya Sule : दत्त दत्त दत्ताची गाय.., दत्तगुरू आणि गाय सोडून सर्व गोष्टींवर GST; मराठी कवितेतून सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर शेलकी टीका
Inflation : मोदी सरकार दरवेळी गेल्या 60 वर्षांच्या कामाकडे बोट दाखवतं, पण आताची आठ वर्षेही खूप आहेत असाटी टोला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे.
मुंबई: देशातल्या वाढत्या महागाईवर लोकसभेत आज झालेल्या चर्चेत दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण करुन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवर सरकारला टोला लगावला. दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध अन् दुधाची साय... ही मराठी कविता वाचत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने दत्तगुरू आणि गाय सोडून मधल्या सगळ्या गोष्टींवर जीएसटी लावला आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा दाखला देत त्यांनी भाजपलाही खडे बोल सुनावले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महागाईच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मराठी कविता वाचून दाखवली. 'दत्त दत्त दत्ताची गाय, गायीच दूध, दुधाची साय, सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याच तूप' ही कविता वाचत सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, यातील दत्तगुरू आणि गाय सोडल्यास दूध, दही, ताक, लोणी आणि तूप या सगळ्यांवर केंद्राने जीएसटी लावला आहे. पनीर, साखर, खोबरेल, तांदूळ यासारख्या सर्व वस्तूंवर जीएसटी लावलं आहे.
आठ वर्षेही खूप झाली
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकार सातत्याने गेल्या 60 वर्षांच्या कामगिरीकडे बोट दाखवतं, पण आठ वर्षेपण खूप असतात. घरातली नवी सून पण इतक्या वर्षात तयार होते. तिलाही घराची जबाबदारी नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं का?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मला फक्त एकच प्रश्न या सरकारला विचारायचा आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं की नाही याबाबत सरकार श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती सांगणार आहे की नाही?
लोकसभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना भाजपला खडे बोल सुनावले. आपल्या अध्यक्षांनी मला घरी बसून पोळ्या लाटायला सांगितलं होतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात महागाई आणि काही वस्तूंवरील जीएसटी यावरून गदारोळ झाला. सोनिया गांधी यांची ईडीची चौकशी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोललेल्या आक्षेपार्ह शब्दांवर सरकार आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाईवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या आजच्या कामकाजाच्या यादीत नियम 193 अन्वये वाढत्या किमतींची चर्चाही करण्यात आली.