Nagpur News : श्वानप्रेमींना दिलासा! मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्याबाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
मनपाद्वारे जागा निश्चित होईपर्यंत, रस्त्यावरील कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवावर कारवाई करण्याचे निर्देशही मनपाला दिले. तसेच सुरु असलेली HC सुनावणी नियमित राहणार असल्याचेही SC ने स्पष्ट केले.
Supreme Court On Feeding Stray Dogs : मोकाट-भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांना दत्तक घेऊन घरी घेऊन जा आणि नंतरच खाऊ घाला, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घातलेली अट सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर ठोठावण्यात येणाऱ्या दंडालाही पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. नागपुरातील धंतोली परिसरात मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले होते. तसेच नागपूर महानगरपालिकेला शहरात कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी विविध भागात जागा निश्चित करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र नागपूर महानगरपालिकेडून अद्याप शहरात जागा निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. मात्र मनपाच्यावतीने तक्रार आल्यावर कुत्र्यांना पकडण्याची कारवाई सुरु होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात श्वानप्रेमींच्या एका गटाने दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर विचार करताना खंडपीठाने अंतरिम आदेश दिला. तसेच मनपाद्वारे जागा निश्चित होईपर्यंत, रस्त्यावरील कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवाला कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही नागपूर महानगरपालिकेला दिले. या दरम्यान सुरु असलेली हायकोर्टातील सुनावणी नियमित सुरु राहणार असल्याचेही स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कोणताही उपद्रव होणार नाही, याची काळजी घेण्याची आमची अपेक्षा आहे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, ज्यांना भटक्या कुत्र्यांचे संरक्षण करण्यात खरोखरच रस असेल तर त्यांनी भटक्या कुत्र्यांना पाळले पाहिजे, घरी नेले पाहिजे. किमान त्यांना चांगल्या श्वान निवारागृहात ठेवा आणि त्यांचा सर्व खर्च महानगरपालिका प्राधिकरण करेल तसचे त्यांची देखभाल, आरोग्य आणि लसीकरण देखील तिथं होईल, असे सांगण्यात आले होते.
सोशल मीडियावरील तक्रारींवरही मनपाची कारवाई
नागपूर महानगरपालिकाद्वारे हायकोर्टाच्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळून आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट / भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर 200 रुपये दंड आकारून वसूल करण्यात येत होते. तसेच मोकाट / भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या पथकाला कुणीही व्यक्तींनी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला होता. तरी शहरातील त्रासदायक मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी मनपाच्या समाज माध्यमांवर (Social Media) पाठवावी असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाकडून या दंडालाही पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
ही बातमी देखील वाचा