NCP : राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
Sunil Tatkare : आम्ही सत्तेत सहभागी होताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रस्ताव आला तर भाजपच्या नेत्यांना विचारावं लागेल असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं.

हिंगोली : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, जर विलिनीकरण करावं लागलं तर त्यासाठी भाजपला विचारावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी केलं. आम्ही एनडीएत आहोत, त्यामुळे आमच्यासोबत येणाऱ्यांनाही एनडीएत राहावं लागेल असंही तटकरे म्हणाले. ते हिंगोलीत माध्यमांशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा स्थानिक पातळीवरती सुद्धा नाही आणि वरिष्ठ पातळीवरही झाली नाही हे मी वारंवार स्पष्ट केलं आहे. ज्यावेळी असा काही प्रस्ताव असेल त्यावेळी कोअर कमिटी त्याबाबत निर्णय घेईल. पण त्यावर निर्णय घेत असताना, भाजपच्या नेतृत्वाला विचारावं लागेल असं सुनील तटकरे म्हणाले.
सत्तेत जाताना भाजपशी चर्चा
सुनील तटकरे म्हणाले की, "आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालोत त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो. केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली म्हणून आमचा सत्तेमधील सहभाग आहे. त्यामुळे अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय घ्यायची शक्यता येईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ तृत्वाशी बोलावं लागेल चर्चा करावी लागेल."
महापालिका निवडणुकांवर स्थानिक नेत्यांशी चर्चा
सुनील तटकरे म्हणाले की, "राज्यात समन्वय समितीची बैठक झाली त्या वेळेला महायुती अबाधित राहून निवडणुकीला समोर जाऊ अशी चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. जिल्ह्यातल्या मतदारसंघातील परिस्थिती सुद्धा वेगळी आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी असं ठरवलं की ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती त्या त्या नेत्यांकडून समजून घ्यावी, त्यानंतर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते बसून जिल्हा निहाय निर्णय घेऊ."
अजितदादा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा
सुनील तटकरे म्हणाले की, अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही माझ्यासहित पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. परंतु आम्ही राजकीय वास्तववादी आहोत, जमिनीवरती आहोत. आम्हाला वास्तव कळतं. भाजपचे 131 आमदार आहेत, शिवसेनेचे 60 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. त्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता कशी होईल त्यावर हे सगळं अवलंबून आहे.
भुजबळांकडून समर्थन
दरम्यान, सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचं मंत्री छगन भुजबळांनी समर्थन केलं. तीनही पक्ष सत्तेत एकत्र आहोत, त्यामुळे विचारलं गेलं तर ठीक आहे असं भुजबळ म्हणाले. तर फडणवीसांच्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलांना चारा खायचा असेल तर विचारावंच लागेल असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
ही बातमी वाचा:





















