बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या 8 वर्षीय मुलीचा मृत्यू; सोलापुरातील करमाळ्यात तिसरा मृत्यू
सोलापुरातील करमाळ्यात आठ वर्षीय चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. करमाळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

सोलापूर : बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूराच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात ही घटना घडली आहे. बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्पशूटरही दाखल झाले आहेत. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्यानंतर त्या ठिकाणी शार्पशूटर दाखल झाले आहेत. परंतु, शार्पशूटर गावात दाखल होण्यापूर्वीच बिबट्यानं आठ वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे.
आज पहाटे बिबट्या गावात आल्याचं गावकऱ्यांना समजलं होतं. गावातील एका गावकऱ्याच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरु होतं. त्यावेळी आठ वर्षांची मुलगी शेतात बाजूला खेळत होती. त्याचवेळी बिबट्यानं संधी साधत आठ वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला केला. बिबट्या आल्याचं पाहून गावकरी त्याला मारण्यासाठी धावत आले. लोकांचा जमाव पाहून बिबट्यानं तिथून पळ काढला. परंतु, यासंदर्भात माहिती वनविभागाला दिल्यानंतर, वनविभागाचं पथक गावात दाखल झाली आहे. गावकऱ्यांना तिथून बाजूला करून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. वनविभागाची जवळपास 100 कर्मचाऱ्यांचं पथक करमाळ्यातील या गावात दाखल झालं आहे. या पथकामध्ये शार्पशूटरही आहेत.
बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केल्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. या नरभक्षक बिबट्यानं गेल्या चार दिवसांत तीन बळी घेतले आहेत. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याचं आव्हान आता वन विभागासमोर उभं ठाकलं आहे. तसेच, बिबट्याच्या दहशतीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरणं पसरलं आहे.
यंदा बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांनी गमावला जीव
राज्यात यावर्षी बिबट्यांचा लोकवस्तीतीळ वावर वाढला आहे. या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांनी आपला जीव गमावला, तर 159 बिबट्यांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिबट्याच्या भितीनं झोप उडाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये असंच दृश्य आहे. औरंगाबाद, बीड, सोलापूर अहमदनगर यांसह अन्य जिल्ह्यांत सध्या बिबट्याच्या वावराने लोक दहशतीखाली आहेत. बीडमध्ये चिमुकल्याला डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं. औरंगाबादेत बापलेक आणि आता शेतात बिबट्याने फडशा पाडला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
