एक्स्प्लोर
शिवसेना-भाजप युतीत संजय राऊत अडसर : सुधीर मुनगंटीवार
संजय राऊत वगळता सेनेचे इतर सर्व नेते भाजप-सेना युतीसाठी तयार आहेत,' असं विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. या विधानावरुन संजय राऊत यांनीही मुनगंटीवारांना उत्तर दिलं आहे.

अमरावती/ मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये युतीवरुन कलगीतुरा रंगतो आहे. 'संजय राऊत हे युतीत अडसर ठरत आहेत, राऊत वगळता सेनेचे इतर सर्व नेते भाजप-सेना युतीसाठी तयार आहेत,' असं विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. या विधानावरुन संजय राऊत यांनीही मुनगंटीवारांना उत्तर दिलं आहे. "युतीसाठी आम्ही काल ही सोबत होतो ,पुढेही सोबत राहू, शेवटी निर्णय शिवसेनेचा, युती जबरदस्तीने होत नाही, भाजपने आपली भूमिका व्यक्त केली आहे शिवसेना युती करणार की नाही हे शिवसेनेला विचारावं ,मात्र शिवसेनेतील संजय राऊत सोडून सर्व आमच्या भेटीला आले," असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. “मुनगंटीवार हे चांगले गृहस्थ पण त्यांचा अभ्यास कमी पडतो आहे.” असा पलटवार संजय राऊत यांनी केला. तसेच, संघ परिवारातील व्यक्तींचा अभ्यास पक्का असायला पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राऊत पुढे म्हणाले की, “2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाट असताना, भाजपने साथ सोडली. त्यावेळी आम्ही युतीसाठी आम्ही प्रयत्न केले. पण शिवसेनेला संपवण्याची वक्तव्य कुणी केली. त्याची उत्तर त्या-त्या पक्षाच्या कार्यकर्त्याने दिलं पाहिजे. गेली 4-5 वर्षे भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेसंदर्भातील उद्दामपणा दाखवून झाला आहे. पण यापुढचे दिवस फक्त शिवसेनेचे आहेत.” दरम्यान, मागच्या वर्षी एका भाषणात सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. पण, तरीही मुनगंटीवार सातत्याने शिवसेना-भाजपच्या युतीसंदर्भातील वक्तव्य करत आहेत. येत्या निवडणुका या शिवसेना-भाजप एकत्रच लढेल असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केला होता.
आणखी वाचा























