सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह 15 जणांविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया लवकरच, एनआयएची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात माहिती
राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं या आरोपींविरोधात 17 विविध कलमांखाली आरोप लावले आहेत. ज्यात युएपीए सह आयपीसीची विविध गंभीर स्वरूपाची कलम समाविष्ट आहेत.
मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी एनआयएनं सोमवारी विशेष कोर्टात आरोपा निश्चितीबाबतचा आराखडा सादर केला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींविरोधात काय आरोप लावले जाणार आहेत याची माहिती कोर्टाला देण्यात आली. यावर कोर्टानं यावर 23 ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीत विचार करून त्यानंतर सर्व आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करू असे निर्देश दिले आहेत.
या प्रक्रियेसाठी सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना तपासयंत्रणेनं लावलेले आरोप मान्य आहेत की नाही याबाबत विचारणा करण्यात येईल. राष्ट्रीय तपासयंत्रणा एनआयएनं या आरोपींविरोधात 17 विविध कलमांखाली आरोप लावले आहेत. ज्यात युएपीए सह आयपीसीची विविध गंभीर स्वरूपाची कलम समाविष्ट आहेत. विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश डी.ई. कोथळीकर यांनी एनआयएला याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणीत बाजू मांडण्यास सांगितलं आहे.
याप्रकरणी सुधा भारद्वाज, रोना विल्सन, शोमा सेन, वर्नन गोन्साल्विस, वरवरा राव, हैनी बाबू, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे यांच्यासह एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळेच सुधा भारद्वाज यांच्यासह काही समाजसुधारकांना पुणे पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून भारद्वाज भायखळा येथील महिला कारागृहात आहेत. या प्रकरणाचा तपास सुरूवातीला पुणे पोलीस तपास करत होते. तेव्हा, पुणे पोलिसांनी फेब्रुवारी 2019 मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलयं. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) कडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला.