विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर कोविड-19 चा उल्लेख राहणार नाही : उदय सामंत
पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड - 19 च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही.
मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड - 19 च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही.
आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.