महाराष्ट्र सदनातील सावरकरांच्या जयंतीवेळी सावित्रीबाई फुले आणि आहिल्यादेवी होळकरांचे पुतळे बाजूला हटवले? विरोधी पक्षांची सरकारवर टीकेची झोड
मुख्य कार्यक्रम सोहळ्यावेळी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे मध्ये येऊ नयेत यासाठी बाजूला असलेल्या एका घुमटाकार जागेत ठेवल्याचं पाहायला मिळत होतं.
नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप राज्यातील विरोधी पक्षांनी करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
आज नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. ही जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे बाजूला करण्यात आल्याचं फोटोंमधून दिसतंय. एबीपी माझा च्या हाती बाजूला ठेवलेला पुतळा पुन्हा मूळ स्थानी ठेवतानाचा व्हिडीओ आला आहे. मुख्य कार्यक्रम सोहळ्यावेळी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे मध्ये येऊ नयेत यासाठी बाजूला असलेल्या एका घुमटाकार जागेत ठेवल्याचं पाहायला मिळत होतं. कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर ठेवण्यात आले.
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी या प्रकारावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही, असं ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटलंय की, "महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?"
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
दरम्यान, देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे. या घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र सदनात घडलेल्या या प्रकारावर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात काय झालं त्याची माहिती घ्यायला हवी, कारण हा संवेदनशील विषय आहे. सगळ्या महापुरुषांचा आम्ही आदर करतो, त्यामुळे यावर माहिती न घेता बोलणे योग्य नाही.
ही बातमी वाचा :