...तर राज्याचे 2 महिन्यात लसीकरण पूर्ण होईल : आरोग्यमंत्री राजेश टोपे
दिवसाला 10 ते 15 लाख लोकांच्या लसीकरणाची राज्याची क्षमता असून केंद्राने सतत लस पुरवल्यास दोन महिन्यात महाराष्ट्राचे लसीकरण पूर्ण होईल, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
जालना : कोरोना संकटातून वाट काढायची असेल तर आज लस एकमात्र उपाय आहे. हे सरकारदेखील जाणून आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे. डिसेंबरच्या आधी देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. या बाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, मुबलक लस पुरवली तर राज्याचं संपूर्ण लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल.
दिवसाला 10 ते 15 लाख लोकांच्या लसीकरणाची राज्याची क्षमता असून केंद्राने सतत लस पुरवल्यास दोन महिन्यात महाराष्ट्राचे लसीकरण पूर्ण होईल, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यात काल एका दिवसात 7 लाखांपेक्षा अधिक लसीकरण करून उच्चांक स्थापित केलाय.
तसेच कोरोनी टेस्टिंगविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, यापुढे अँटीजन टेस्टनुसार नाही तर आरटीपीसीआर टेस्टनुसारच पॉझिटिव्हीटी रेट काढण्यात येणार आहे. यापुढे अँटीजन पॉझिटिव्हिटी रेटसाठी गृहीत धरणार नसल्याचे यांनी म्हटलंय. दरम्यान निर्बंध हे फार साधारण असून ते गरजेचे असल्याचे सांगत राजेश टोपे यांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यावर यावर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटलंय.
राज्यात आज 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,562 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 57,90,113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 143 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 252 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1525 रुग्ण तर धुळ्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
एकूण सात जिल्ह्यात रुग्ण संख्या 10 च्या खाली
धुळे 0, नंदूरबार 3 रुग्ण, भंडारा 4 रुग्ण, गोंदिया 5 रुग्ण, नांदेड 6, यवतमाळ 7 रुग्ण, वर्धा 9 रुग्णांची नोंद झाली आहे. तर धुळ्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.