Professor Recruitment : पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु, पहिल्या टप्प्यात 3074 प्राध्यापकांची भरती
प्राध्यापकांच्या वतीनं 21 तारखेपासून पुण्यातील उच्च तंत्रज्ञान शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु होतं. त्या आंदोलकांची राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी भेट घेतली होती.
मुंबई : कोरोनामुळे रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा पुढच्या आठवड्यापासून सुरु होणार असून त्यामध्ये 3074 प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. सोबतच 121 जागांवरती ग्रंथपाल भरती आणि विद्यापीठांमधील 659 जागांवरती अन्य भरती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
पुण्यामध्ये उच्च तंत्रज्ञान शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीनं 21 तारखेपासून प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरु झालं होतं. काही आंदोलनं ही जुलै महिन्यातही होणार आहेत. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा आहे. प्राध्यापक भरती लवकर करावी आणि मासिक भत्ता बंद करुन समान वेतन धोरण जाहीर करावं अशी प्रमुख मागणी या आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत शनिवारी पुण्यातील आंदोलकांची भेट घेतली होती आणि लगेचच प्राध्यापक भरती करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर प्राध्यापकांनी पुण्यातील आंदोलन मागं घेतलं.
आता राज्य सरकारच्या घोषणेमुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने प्राध्यापक भरतीचा कोणताही निर्णय घेतला नव्हता.
महत्वाच्या बातम्या :