(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटी संपावर राज्य सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवार यांनी सांगितला 'हा' तोडगा!
ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
ST Workers Strike updates : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता कमी होण्याची चिन्हं नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात यावा यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी या बैठकीत तोडगा सांगितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार, महामंडळाने हा तोडगा स्वीकारल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच ते 10 हजार रुपयांची वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतन वाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन, संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी वेतन वाढ करण्याची सूचना शरद पवार यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार-अनिल परब बैठकीत काय झालं?
शरद पवार आणि अनिल परब यांच्यात झालेल्या बैठकीच्या वेळी एसटी महामंडळाचे अधिकारीदेखील होते. या बैठकीत एसटी कर्मचारी आणि इतर राज्यातील परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे सादरीकरण करण्यात आले. गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात कमी पगार आहे. तर, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास सारखाच आहे. मध्यप्रदेशमधील कर्मचाऱ्यांचा पगार महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे.
एसटी कर्मचाऱ्यांमधील प्रत्येक श्रेणीतील कामगार-कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच ते 10 हजार रुपयांनी पगार वाढवण्यात येणार आहे.
बैठकीनंतर अनिल परब काय म्हणाले?
मागील काही दिवस एसटी संप सुरु आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. आज मला शरद पवार यांनी बोलावलं होतं. अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. यातून काय मार्ग निघू शकतो, संप कसा मिटू शकतो त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत, एसटीची आर्थिक परिस्थिती, एसटी रुळावर कशी येईल, संपकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा झाली. शरद पवार यांना सर्व माहिती दिली. याबाबतीत वेगवेगळे पर्याय कसे काढता येतील, मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान करता येईल याबाबतही चर्चा झाली.
विलिनीकरणाबाबत काय म्हणाले परब?
विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे. सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु. हा अहवाल हायकोर्टाच्या समितीच्या माध्यमातूनच येईल. पण त्यासमोर आपण काय बाजू मांडायची याबाबत सविस्तरपणे शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Sanjay Raut on ST Strike : महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत - संजय राऊत
ST Strike : एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला; संप महिनाभर सुरु राहणार?
एसटी संप: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha