'लालपरी'नं उभ्या महाराष्ट्राला साथ दिली, तिच्या चालकांवर आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ, भाजप नेते आक्रमक
ST workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण न झाल्यानं आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्यानं आंदोलन अजून तापू लागलं आहे. आंदोलनात आता भाजप देखील मैदानात उतरली आहे.
ST workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण न झाल्यानं आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्यानं आंदोलन अजून तापू लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता भाजप देखील मैदानात उतरली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष देखील करु असं म्हटलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानच्या बचावासाठी ठाकरे सरकार जीवाचं रान करतंय, पण 28 मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरसुद्धा यांच्या माणुसकीला जराही पाझर फुटत नाही. ज्या लालपरीने उभ्या महाराष्ट्राला त्याच्या सुख-दुखाच्या प्रवासात निरंतर अहोरात्र साथ दिली. आज तिच्याच चालकांवरती आपला आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ येत असेल तर हे खूप लाजिरवाणा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली.
पडळकर यांनी म्हटलं आहे की, एस टी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नका. आपण संघर्ष करू अशी विनंती पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना केलीय. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी संघटनेत फूट पाडून अफवा पसरवतं आणि पोलिसांच्या बळाचा गैरवापर करून संप चिरडण्याचा प्रयत्न करतंय. जे ‘राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना’लवकरात लवकर द्यावं. कुठल्याही पोलीस बळाचा वापर करू नये. अन्यथा आणखी एखाद्याने जीव गमावला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल असेही, पडळकर म्हणालेत.
गेल्या 6 महिन्यात 27 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावरती पडली आहेत. त्यांच्या सोबत घाणेरडं राजकारण करणं बंद करा व त्वरीत एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.
सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार - चंद्रकांत पाटील
सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांशी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. पाटील यांनी सांगितलं की, एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात भाजप सहभागी होणार आहे.
आतापर्यंत राज्यात 27 कर्मचार्याच्या आत्महत्या झाल्या आहेत. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचं 'दिवाळं' निघाल्याशिवाय राहणार नाही- चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, जवळपास 28 एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ऐन दिवाळीत त्यांच्या घरात अंधार पसरलाय. पण मंत्री महोदय आहेत कुठे? मंत्र्यांनी बदल्यांच्या दलालीतून वेळ काढावा. कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यावे. अन्यथा दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचं ‘दिवाळं’ निघाल्याशिवाय राहणार नाही, भावांनो आत्महत्या करू नका रे. परिवाराचा, आपल्या कच्च्याबच्च्यांचा विचार करा.. या मुर्दाड सरकारला वठणीवर आणायला आम्ही भारतीय जनता पार्टी पुर्ण ताकतीने आपल्या पाठीशी आहोत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
जवळपास २८ एस टी कर्मचा-यांच्या आत्महत्या..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 29, 2021
ऐन दिवाळीत त्यांच्या घरात अंधार पसरलाय..
पण मंत्री महोदय आहेत कुठे?
मा.मंत्र्यांनी बदल्यांच्या दलालीतून वेळ काढावा..
कर्मचा-यांकडे लक्ष द्यावे..
अन्यथा दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणा-या सरकारचं ‘दिवाळं’ निघाल्याशिवाय राहणार नाही
कर्मचाऱ्यांनं टोकाचं पाऊल उचलू नये-मंत्री अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यानं केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. याबाबत मी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत बोललो आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांनं टोकाचं पाऊल उचलू नये. एसटी रूळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते. शिवाय, सध्याचा काही ठिकाणी सुरू असलेल्या संपाबाबत देखील मी कर्मचाऱ्यांशी, त्यांच्या संघटनांशी बोलत आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकार घेईल असं देखील यावेळी परब यांनी म्हटलं आहे.