एक्स्प्लोर
संपामुळे एसटी महामंडळाचं 15 कोटींचं नुकसान
संपामुळे एसटीचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्के बसेसच्या फेऱ्या सुटल्या, तर राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते.

धुळे : राज्यभरात विविध ठिकाणी एसटीच्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला. संपामुळे एसटीचा सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्के बसेसच्या फेऱ्या सुटल्या, तर राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. राज्यातील 145 आगारांमध्ये काही प्रमाणात वाहतूक सुरु होती. तसेच राज्यातील 80 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवले. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 60 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 35 हजार 249 बस फेऱ्यांपैकी 10 हजार 397 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या. मात्र रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या : एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते. याशिवाय 17 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2017 याकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. किती एसटी गाड्या, किती कर्मचारी संख्या? राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे. दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो? चालकांचा (ड्रायव्हर) पगार : महाराष्ट्र – 4700 ते 15367 रुपये कर्नाटक- 12400 ते 17520 तेलंगणा – 13070 ते 34490 राजस्थान- 5200 ते 20200 उत्तर प्रदेश- 5200 ते 20200 वाहकांचा (कंडक्टर) पगार : महाराष्ट्र- 4350 ते 14225 रुपये तेलंगणा- 12340 ते 32800 कर्नाटक- 11640 ते 15700 राजस्थान- 5200 ते 20200 उत्तर प्रदेश- 5200 – 20200 इतर राज्यात ग्रेड पे दिला जातो, महाराष्ट्रात नाही! याशिवाय इतर राज्यातील चालक आणि वाहकांना दीड हजार ते दोन हजार रुपये ग्रेड पे दिला जातो. मात्र,महाराष्ट्रातील एसटी चालक-वाहकांना हा ग्रेड पे मिळत नाही. इतर राज्यात प्रवासी कर कमी, महाराष्ट्रात जास्त! दुसरीकडे इतर राज्यात प्रवासी कर 5 ते 7 टक्के इतका आहे. तर महाराष्ट्रात हा प्रवासी कर 17.5 टक्के इतका आहे. असं असूनही महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी का? असा सवाल एसटी कर्मचारी करत आहेत.
आणखी वाचा























