सोलापूर महानगरपालिका स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापती निवडीत पुन्हा पेच
स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड ही महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ तरतुदींशी विसगंत असल्याने अधिनियमाच्या कलम 451 (1) अन्वये सदरील ठराव निलंबित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसेच संबंधिताना हरकती नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत देखील देण्यात आली आहे.
सोलापूर : महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतींच्या निवडीत पुन्हा पेच निर्माण झालाय. गटनेते पदाच्या वादातून थेट स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केलीय. एमआयएमचा गटनेता कोण या वादातून मागील आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशामुळे आज ही प्रक्रिया पार पडणार होती. आज निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शासनाने संपूर्ण स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केली. त्यामुळे आज होणारी निवडणूक प्रक्रिया देखील रद्द करावी लागली आहे.
स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड ही महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ तरतुदींशी विसगंत असल्याने अधिनियमाच्या कलम 451 (1) अन्वये सदरील ठराव निलंबित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसेच संबंधिताना हरकती नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत देखील देण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला विकासापासून रोखण्याचे काम केले आहे. असा आरोप भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी केला.
2018 पासून स्थायी समितीच्या सभापतीविनाच सुरु आहे पालिकेचा कारभार
2018 साली सत्ताधारी भाजपच्या विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटात चढाओढ पाहायला मिळाली होती. ऐन अर्ज दाखल करण्याच्या वेळी विजयकुमार देशमुख गटातील एका कार्यकर्त्यांने सुभाष देशमुख गटातील सभापती पदाच्या उमेदवाराचा अर्ज पळवून नेला होता. हा सगळा गोंधळ न्यायलयात पोहोचल्याने जवळपास 3 वर्ष स्थायी समितीच्या सभापतीविनाच पालिकेचा कारभार सुरु होता.
(सभापती निवड जाहीर होण्याआधी कार सजवून ठेवण्यात आली होती, मात्र ऐनवेळी निवड प्रक्रियाच रद्द झाली)
आता गटनेते पदाच्या वादातून निवड प्रक्रिया लांबणीवर
सर्वोच्च न्यायलयाने समिती निवडण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांची निवडीत एमआयएमचा गटनेता कोण यावरुन वाद निर्माण झाला. सोलापूर महानगरपालिकेत एमआयएमचा गटनेता म्हणून रियाज खरादी यांची नोंद आहे. तर विभागीय आयुक्तांकडे नुतन गायकवाड यांची नोंद आहे. या दोन्ही नगरसेवकांनी वेगवेगळी नावांचा प्रस्ताव महापौरांकडे सादर केला होता. दोन वेगवेगळी पत्र आल्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी रियाज खरादी यांचा प्रस्ताव मान्य करत त्यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड केली. मात्र ही निवड चुकीची असल्याची तक्रार नुतन गायकवाड यांनी नगरविकास खात्याकडे तसेच न्यायलयात देखील केली होती.
मागील आठवड्यात सभापतीनिवडीच्या दिवशी नगरविकास खात्याने एमआयएमच्या गटनेता कोण या वादातून निवडणुक प्रक्रियेला स्थगिती दिली. तसेच पालिका प्रशासनाला या बाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देखील दिले. तर इकडे न्यायलयाने स्थगिती उठवून निवडणुक प्रक्रिया तात्काळ घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया आज घेण्याचे निश्चित झाले. सकाळी 11.30 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु होताच शासनातर्फे आलेला आदेश पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी वाचून दाखवला. शासनाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ तरतुदींशी विसगंत असल्याने अधिनियमाच्या कलम 451 (1) अन्वये सदरील सदस्यांच्या निवडी निलंबित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
सत्ताधारी भाजप ठोठवणार न्यायालयाचा दरवाजा : महापौर यन्नम
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला विकासापासून रोखण्याचे काम केले आहे. असा आरोप भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी केला. एमआयएमच्या गटनेते पदाचा वाद असताना संपूर्ण समितीच निंलबित करण्यात आली आहे. हा सत्तेचा गैरवापर असून भाजप या विरोधात न्यायलयाचा दरवाजा ठोठवणार असल्याची माहिती महापौऱ श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :