Solapur : शेतकऱ्याला परत केलेल्या रकमेहुन मिळाले अधिकचे बक्षीस, सोलापूर पोलीस आयुक्तांकडून अनोखे कौतुक..!
पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळे यांनी एका शेतकऱ्याचे हरवलेले 11 हजार रोख रुपये परत केले. त्याबद्दल सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी त्यांना बक्षीस देऊन गौरव केला.
सोलापूर : पोलीस लोकांना नियम पाळायला लावतात, प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करतात, समाजातील काळे धंदेवाल्यांना वठणीवर आणतात. पण कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिस दलातील अनेकांनी आपल्या प्रामाणिकपणाची प्रचिती वेळोवेळी दिली आहे. सोलापूरातील पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळ हेही त्यापैकीच एक. एका शेतकऱ्याचे हरवलेले 11 हजार रुपये त्यांनी परत केले. परशुराम केंचनाळ यांच्या या प्रामाणिकपणाची दखल सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी घेतली आणि 11 हजार एक रुपये देऊन सत्कार केला.
पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळ यांच्या प्रामाणिकपणाचे पोलीस दलात सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर पोलिसांनीही चांगलं काम करावं, पोलीस दलाची प्रतिमा उजळावी असं मत पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केलं. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून शेतकऱ्याच्या हरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम बक्षीस म्हणून देऊन गौरवण्यात आले.
शेतकऱ्याचे 11 हजार रुपये परत केले
पोलीस अमंलदार परशुराम केंचनाळ हे शांतीचौकात कर्तव्य बजावर असताना त्यांना एक पाकीट सापडलं. त्या पाकिटात रोख 11 हजार रुपये होते. थोड्या वेळाने ते पाकीट ज्या शेतकऱ्याचं होते तो शेतकरी हवालदिल होऊन इकडे-तिकडे शोधत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. महादेव रासुरे असं त्या शेतकऱ्याचं नाव होतं. रासुरे यांच्याजवळ जाऊन परशुराम केंचनाळे यांनी चौकशी केली आणि खात्री करुन त्यांची सर्व रक्कम परत केली. महादेव रासुरे यांनी ही रक्कम परत मिळताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी भावनिक होऊन पोलीस अंमलदार परशुराम केंचनाळे आणि पोलीस खात्याचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या :