Solapur : लाखो भाविकांच्या उपस्थितीचे हुलजंती येथे पार पडला गुरु-शिष्य भेटीचा सोहळा
कोरोना संकटानंतर दोन वर्षाने हा गुरु-शिष्य भेटीचा सोहळा पार पडला असून यावेळी राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.

सोलापूर : देशातील धनगर समाजाचे आराध्य असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच , तामिळनाडू , गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव या अनोख्या भेटीसाठी हुलजंती येथे आले होते .
या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता. बाराव्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा असून दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी चारच्या दरम्यान हा अनोख्या भेटीचा सोहळा पार पडला.
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज वर्षभर वाट पाहत असतो. बिरोबा व महालिंगराया, या गुरू-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दीपावाली पाडव्याला दुपारी चारच्या दरम्यान संपन्न झाला. अमावास्येला म्हणजे गुरुवारी रात्री 12 वाजता मुंडास बांधले गेले. मध्यरात्री कैलासमधून शंकर पार्वती पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात अशी समजूत आहे. यावेळी देवाची मूक भाकणूक झाली असेही मानतात.
त्यानंतर आज गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या दूध ओढ्यात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवीत इतर पालख्यानी महालिंगराया पालखीची भेट घेतली. यावेळी महालिंगराया-बिरोबाच्या नावान चांगभलंच्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात करण्यात येते. नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. हुलजंतीला हालमत धर्माची कशी मनाली जाते. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली परंपरेनुसार त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पाडत असतो.
महत्वाच्या बातम्या :
- दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार असल्याने पंढरपुरात दिवाळी जोरात, व्यापाऱ्यांना कार्तिकीचे वेध
- Kartiki Ekadashi : यंदाची कार्तिकी यात्रा विक्रमी होणार, 6 ते 24 नोव्हेंबरपर्यंत चोवीस तास मुखदर्शन; मंदिर समिती बैठकीत निर्णय
- Kartiki Ekadashi : यंदा आषाढी कार्तिकीला विठुरायाचं भाविकांना दर्शन होणार; कोरोनाचे नियम पाळून वारकरी संप्रदायाची कार्तिकी यात्रा भरणार?























