'नाग'पूर... बाप रे बाप, एकाच घरात आढळले 14 कोब्रा साप; सर्पमित्रांमुळे जीव भांड्यात पडला
नागपूरच्या निलडोह नगरपंचायतीच्या हद्दीतील अमर गनर येथील दिलीप यादव यांच्या घरी आज पहाटेच्या सुमारास अगोदर नागाचे एक पिल्लू आढळले होते.
नागपूर : उन्हाळा आला की धगीमुळे साप (Snake) आपल्या बिळातून बाहेर निघतात, असे जाणकार सांगतात. मात्र, पावसाळ्यातही साप निघत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यातच, सध्या सर्पमित्रांची संख्या वाढल्याने आणि सापांबद्दल जागृती झाल्यामुळे कुठेही साप निघाल्यास पहिल्यांदा सर्पमित्रांना बोलावणं धाडलं जातं. नागपूर लगत निलडोह नगरपंचायत (Nagar Panchayat) अंतर्गत येणाऱ्या अमर नगर येथील एका घरी आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास तब्बल 14 विषारी नागाची (कोब्रा) पिल्लं (cobra) आढळून आली आहेत. परिसरातील सर्पमित्रांनी त्या पिल्लांना पकडून वनविभागाच्या स्वाधीन करुन नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. त्यामुळे, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
नागपूरच्या निलडोह नगरपंचायतीच्या हद्दीतील अमर गनर येथील दिलीप यादव यांच्या घरी आज पहाटेच्या सुमारास अगोदर नागाचे एक पिल्लू आढळले होते. त्यामुळे, यादव यांनी घरातून त् पिलाला हुसकावून लावले. मात्र, काही वेळानंतर परत दोन पिल्लं आढळून आल्याने त्यांनी शेजारीच राहणाऱ्या दिलीप बर्वेकर यांना याबाबत माहिती दिली. बर्वेकर यांनी तात्काळ विदर्भ सर्पमित्र समितीच्या कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला. काही वेळातच आकाश आणि त्याचे दोन साथीदार यादव यांच्या घरी पोहोचले.
यादव आणि बर्वेकर यांच्या घराच्या मधात असलेल्या गल्लीतील कचऱ्यातून सर्पमित्रांनी दोन तासांच्या मेहनतीनंतर तब्बल 14 नागाची पिल्लं शोधून बाहेर काढली. या सर्वच पिल्लांना त्यांनी प्लास्टिकच्या बरणीमध्ये टाकून वनविभागाच्या अधिवासात सोडून आले. नुकेत जन्मलेली ही पिल्लं काही दिवसांची आहेत, असे या सर्पमित्रांनी सांगितलं. तर, या पिलांना जन्म देणाऱ्या मादीचा देखील शोध घेण्यात आला. पण, ती कुठेही दिसून आली नाही. पिलांना जन्म दिल्यानंतर ती दूर निघून गेली असावी असे सर्पमित्र आकाशने म्हटले. दरम्यान, नागाची एवढी पिल्लं आढळून आल्याने परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, सर्पमित्रांनी ही पिल्ले नेल्याने, आणि घाबरण्याचे कारण नसल्याचे आश्वस्त केल्याने रहिवाशांचा जीव भांड्यात पडला आहे.
हेही वाचा
टशन, खुन्नस, आरेला कारेने उत्तर देण्याची तयारी, नव्या टीम इंडियाची धुरा गौतम गंभीरच्या हाती