Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येत आफताबच्या कुटुंबीयांचाही सहभाग; एबीपी माझाशी बोलताना श्रद्धाच्या वडिलांचा गंभीर आरोप
Shraddha Murder Case : वसई येथील श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आपली सविस्तर भूमिका एबीपी माझाकडे मांडली. यावेळी त्यांनी तिच्या हत्येत अफताब याच्या कुटुंबीयांचा देखील सहभाग असल्याचे म्हटले आहे.
Shraddha Murder Case : वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावाला यानं केली आणि देश हादरला. हत्येनंतर या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येतेय. आज एबीपी माझानं श्रद्धा वालकरच्या वडिलांशी संवाद साधला, तेव्हा या सगळ्या प्रकरणावर प्रथमच त्यांनी मन मोकळं केलं. मुलीच्या भल्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि आफताबशी तिचं लग्न व्हावं म्हणून त्याच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्यांचा काय अनुभव होता हे देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येत आफताब पूनावालाच्या कुटुंबीयांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर तिच्या वडिलांनी प्रथमच आपली सविस्तर भूमिका एबीपी माझाकडे मांडली.
श्रद्धाचे वडील लग्नाचा प्रस्ताव घेऊन अफताब याच्या घरी गेले होते. परंतु, आफताबने लग्नाला नकार दिला होता. एवढेच नाही तर आफताबचे कुटुंबीय देखील या लग्नासाठी तयार नव्हते. मुलीच्या हत्येत आफताब आणि त्याच्या कुटुंबीयांचाही हात आहे, असा आरोपत तिच्या वडिलांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे श्रद्धाच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर आफताबचे कुटुंब देखील अद्याप बेपत्ता आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
श्रद्धाचे वडील विकास वालकर आणि त्यांची पत्नी हर्षिला वालकर ऑगस्ट 2019 मध्ये आफताबच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले होते. विकास यांनी आफताबच्या कुटुंबीयांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. उलट यावेळी आफताबच्या चुलत भावाने त्यांना पुन्हा कधीही आमच्या दारात येऊ नका, असे म्हणत त्यांना अपमानित केले. त्यानंतर काही दिवसांमध्ये श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर अफताब यांच्या कुटुंबीयांना पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला नाही, असे विकास यांनी सांगितले.
विकास वालकर यांनी सांगितले की, "आफताबच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत काहीतरी तोडगा काढला असता तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. आफताबचे पालक लग्नाबाबत चर्चा करायला तयार नव्हते. त्यामुळे अफताब आणि श्रद्धांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही दुर्घटना घडली. आफताबच्या कुटुंबाचा यात सहभाग असल्याचे मला आधी माहीत नव्हते. परंतु, आफताबला त्यांचा पाठिंबा असल्याचे दिसते. श्रद्धाला अनेक वेळा फोन करून बोलत असे, पण आमच्यात तेवढे बोलने होत नव्हते. आम्ही श्रद्धाला आफताबपासून वेगळे करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती. आम्ही आमच्या नातेवाईकांकडून देखील तिचे समुपदेशन करायला सांगितले, पण ती कोणाचेही ऐकायला तयार नव्हती.
"श्रद्धा अनेक दिवसांपासून संपर्कात नव्हती. त्यामुळे मी माझ्या मुलाला माझा मित्र लक्ष्मण नाडर यांच्यासोबत संपर्क साधण्यास सांगितले. लक्ष्मण यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही पोलिसात जाऊन लेखी तक्रार दिली. माणिकपूर आणि दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची उकल करण्यात खूप मदत केली. माणिकपूर आणि दिल्ली पोलिसांनीही माझे म्हणणे ऐकून घेऊन तपास सुरू केला. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी सरकारला विनंती करतो, असे विकास वालकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या