Vasant More: भरत गोगावलेंकडून विधानसभा निवडणुकीआधी अघोरी पूजा, वसंत मोरेंचे गंभीर आरोप...
Vasant More: विधानसभा निवडणुकीपूर्वी भरत गोगावले यांनी आपल्या घरी अघोरी पूजा केल्याचा खळबळजनक दावा वसंत मोरे यांनी केला आहे.

पुणे: राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पुन्हा रंगत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी थेट रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना शिंदे यांच्या गटातील मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याविरोधात गंभीर आरोप करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वसंत मोरे यांनी दावा केला की, “भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आपल्या घरात अघोरी पूजा केली होती. त्यांनी उज्जैन येथून बागलामुखी देवीच्या मंदिरातील 11 महाराजांकडून पूजा घातली.”
नेमकं काय म्हणालेत वसंत मोरे?
विधानसभा निवडणुकीपूर्वी भरत गोगावले यांनी आपल्या घरी अघोरी पूजा केल्याचा खळबळजनक दावा वसंत मोरे यांनी केला आहे. वसंत मोरे म्हणाले, “18 ऑक्टोबर 2024 रोजी गोगावले यांनी उज्जैन येथील बागलामुखी देवीच्या मंदिरात 11 महाराजांसोबत पूजा केली. त्यानंतर त्यांना आपल्या घरी बोलावून पूजा घातली होती. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला?” असा सवालही वसंत मोरे यांनी केला आहे. या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले आणि त्या पूजांचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत. “जर गोगावले यांनी हे नाकारले, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू,” असंही वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
रश्मी वाहिनी यांच्यावर केलेले चुकीचे आरोप हे भरत गोगावले यांच्या अकलेच्या निघालेले दिवाळे आहे. महिलांनी राजकारणात सहभाग घेतला पाहिजे असं म्हणतात. एखादी महिला नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहत असेल तर त्यात काय गैर आहे. गोगावले यांना प्रश्न आहे, 17 ऑक्टोबर 2024 रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते, ज्या पूजा घातल्या त्या कशाला घातल्या?11 पुजारी बोलवून त्यांच्याकडून कशाला पूजा कशाला केल्या. बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या. निवडणूक आधी गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा कशाला घातल्या. ओम फट स्वाहा जे करतात त्यांना आणलं जातं. महाराष्ट्रातले अनेक नेते तिथे जातात 15 लाख रुपये एका पूजेला लागतात, असा गौप्यस्फोट वसंत मोरेंनी केला आहे. . हे आरोप करताना मोरे यांनी काही व्हिडीओदेखील समोर आणले आहेत.
भरत गोगावले रश्मी ठाकरेंबद्दल काय म्हणालेले?
भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षफुटीवर भाष्य करताना म्हटलं होतं, आम्ही शिवसेनेच्या बाहेर पडायला अनेक कारणं आहेत. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप हवा यावर विचार करायला पाहिजे. पडद्यामागून वहिनींचा बराचसा हस्तक्षेप होता. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची जी कामाची पद्धत होती, ती उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसली नाही. महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना द्यायला हवं होतं. आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद द्यायला नको होतं, पण रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे आदित्य ठाकरेंना पद मिळाल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं.
























