Sanjay Raut : मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, 103 आमदार निवडून आणणार; संजय राऊत कडाडले
Sanjay Raut Granted Bail: यापुढे महाराष्ट्रात फक्त एकच शिवसेना राहणार आणि ती म्हणजे ठाकरे यांची शिवसेना, असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी केला.
![Sanjay Raut : मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, 103 आमदार निवडून आणणार; संजय राऊत कडाडले Shivsena Sanjay Raut Granted Bail said shivsena will win 103 seats in Maharashtra Assembly Marathi News Sanjay Raut : मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, 103 आमदार निवडून आणणार; संजय राऊत कडाडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/09cffc40aac17edfdc30aeb5378e78e11667375312822272_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : हे बाळासाहेबांनी तयार केलेलं रसायन आहे, झुकणार नाही, मी 103 दिवस तुरुंगात होतो आता 103 आमदार निवडून आणणार असा निर्धार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. माझ्या अटकेने सुरुवात झाली होती, आता मी सुटलो आहे, आता सुसाट जायचं असंही संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत हे आज तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ते म्हणाले की, "मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल. मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे 103 आमदार निवडून आणणार."
आपल्याला अटक करणं राजकारणातील सर्वात मोठी चूक असल्याचं सांगत संजय राऊत म्हणाले की, "गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही. लोकांनी माझं 100 दिवसांनाही स्मरण ठेवलं, त्यांनी जल्लोष केला. हे माझं स्वागत नसून शिवसेनेचं स्वागत आहे. यापुढे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा पक्षासाठी देणार. आता रडायचं नाही तर लढायचं."
संजय राऊत हे बाळासाहेबांनी तयार केलेलं रसायन आहे, मी कधीही झुकणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते. शिवसैनिकांच्या गराड्यातच त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. संजय राऊतांनी नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
संजय राऊत यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच ढोल आणि ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. संजय राऊत दिवाळीच्या वेळी तुरुंगात होते, आता त्यांची सुटका झाल्यानंतर तीन दिवस दिवाळी साजरी करु असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "बाहेर आलोय, आता बघू. न्यायालयाने सांगितलंय आपली अटक बेकायदेशीर आहे. आम्ही लढणारे आहोत. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)