राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही : संजय राऊत
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 11 दिवस उलटून गेले तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही. आज संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेना अडथळा आणत नसल्याचं सांगितलं आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 11 दिवस उलटले तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही. या पार्शभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती. राज्यातील सत्तास्थापनेबाबत राज्यपालांनी पुढाकार घेऊन सत्तेचा गुंता सोडवावा, अशी मागणी केली असल्याची माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही. सरकारस्थापनेला उशीर का होत आहे यांची माहिती आम्हाला नाही. घटनेनुसार जे योग्य असेल त्यासाठी शिवसेना सहकार्य करेल. त्यामुळे लवकर सरकार स्थापन व्हावं, अशी मागणी केली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
विधानसभा निकालानंतर सत्तास्थापन होत नाही, त्यासाठी योग्य वेळी हालचाल होणे गरजेचं आहे. राज्यपालांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि राज्यातील सत्तेचा गुंता सोडवावा. बहुमत असलेल्या पक्षाला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं. म्हणजेच लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल आणि महाराष्ट्राला चांगलं सरकार मिळेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
राज्याला कायद्याची आणि राजकारणाची जाण असलेले राज्यपाल मिळाले आहेत. राज्यपाल हे तटस्थ असतात, त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेतील. राज्यातील सत्तास्थापनेबाबतची भूमिका आम्ही मांडली आहे. लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन व्हावं आणि महाराष्ट्राला चांगलं सरकार मिळावं, अशी भूमिका राज्यपालांकडे मांडल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.