मविआच्या दोन तोफा फडणवीसांवर धडाडल्या, राऊत म्हणाले, फडणवीसांना चांगलं कळतंय, मलिक म्हणतात, सगळा खेळ त्यांचाच!
Sanjay Raut Press Conferance : संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि ईडीवर थेट निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Press Conferance : सरकार चालवताय की, माफियांची गँग, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. पुढची पत्रकार परिषद आपण थेट ईडीच्या कार्यालयासमोर घेऊ आणि ईडीच्या घोटाळ्याचं कशा पद्धतीनं कामकाज चालतंय या साऱ्याचा पर्दाफाश करु, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. तसेच मला काय सांगायचं आहे, हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना चांगलं कळतंय, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच संजय राऊतांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना नवाब मलिकांनीही थेट देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत टीका केली आहे. त्यामुळे या प्रकरणात फडणवीस कनेक्शन नेमकं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही पाहत राहा फक्त याचे सुत्रधार कोण आहेत. बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत. ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना? मग हे दोन-तीन लोक, कार्यालयात बसतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात. काय करायचंय? कोणाला बोलवायचं? कोणाला टॉर्चर करायचं? मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि त्यांना माहितीये मला काय सांगायचंय ते."
"हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबालाही भयंकर त्रास देत आहेत. खोटे पुरावे निर्माण करतात. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो. मी मागेही म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही.", असं संजय राऊत म्हणाले.
पाहा व्हिडीओ : आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही : संजय राऊत
हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू : नवाब मलिक
महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर एक महिन्यापूर्वी दबाव आणला आणि मी त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही, म्हणून इडीची चौकशी मागे लावली, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्यसभेच्या सभापतींना थेट पत्र लिहिलं आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना नवाब मलिकांनीही भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच मलिकांनीही थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहे, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केला आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) बोलताना म्हणाले की, "हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहे. माझं म्हणणं आहे की, त्यांना ओएसडी करून टाका. तेच रोज ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर कारवाई करायची ते सांगतात. आमच्या देखील अनेक मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्यांनी लक्षात घ्यावं, ते कोणाला कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावत आहेत? कोण कोणत्या बँकांची माहिती घेत आहेत? हे आम्हाला माहिती आहे. मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, त्यांनी राजकीय पक्षाच्या इजंट सारखं काम करू नये."
पाहा व्हिडीओ : हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून : नवाब मलिक
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर खळबळजनक आरोप केले आहेत. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे पत्र माहितीसाठी ट्रेलर अजून बाकी आहे, असं राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावे मोठमोठे घोटाळे आहेत. केंद्र सरकारमुळे आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही; फडणवीसांचं नाव घेऊन राऊतांचा थेट हल्ला
- आजचं पत्र फक्त माहितीसाठी, हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचाय : संजय राऊत
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha