Sanjay Raut : दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, राऊतांचा आरोप, बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत करण्याची मागणी
बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
Sanjay Raut : ताबडतोब बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात (Belgaum) मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले हा त्याच कटाचा भाग असल्याचे राऊत म्हणाले.
राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
संजय राऊत यांनी मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ज्या सरकारला राज्याच्या सीमा राखता येत नाहीत, त्या सरकराला एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. कर्नाटक महाराष्ट्रातील काही भागावर दावा सांगत असताना सरकार तोंडाला कुलूप लावून बसले आहे. यांना कुलूप निशाणी द्या असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत म्हणूनच शिवसेनेचं सरकार घालवलं
गेल्या 24 तासापासून सीमाभागामध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे. प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. मग महाराष्ट्र सरकार आहे की नाही? असा सवाल राऊतांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवस हे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत जात आहे. त्यांना भेटून काय उपयोग, त्यांना कळत नाही का? महाराष्ट्रात काय चाललयं ते असा सवालही राऊतांनी केला. महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत म्हणूनच शिवसेनेचं सरकार घालवलं असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातवर गेल्या 55 वर्षात अशी वेळ आली नव्हती. एवढे हतबल मुख्यमंत्री, एवढं लाचार सरकार महाराष्ट्रानही कधीही पाहिलं नाही असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा विरोधी पक्षांनी लढाई केली
105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान देऊन महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. मात्र, सध्या महाराष्ट्र कुरतड्याचे काम सुरु असताना सरकार काहीच करत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळं आता सगळ्यात जास्त विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर असं संकट आलं तेव्हा तेव्हा विरोधी पक्षांनी लढाई केली असल्याचे राऊत म्हणाले. सध्या महाराष्ट्राची लूट सुरु आहे. ही लूट दिल्लीच्या चरणी अर्पण करावी म्हणून राज्यातील सरकार सत्तेवर बसल्याचे राऊत म्हणाले. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर हल्ले सुरु आहेत, ते पाहता या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: