Maharashtra and Karnataka Border Dispute: बेळगाव सीमाभागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट
Maharashtra and Karnataka Border Dispute: बेळगाव सीमेवर महाराष्ट्र पासिंग ट्रकवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.
Maharashtra and Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा (Maharashtra and Karnataka Border Dispute) एकदा ऐरणीवर आला आहे. बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर आज बेळगावजवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर आज कन्नड संघटनांचा विरोध आणि मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर आज आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. तरीदेखील कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्राला डिवचण्याचे काम कन्नड रक्षण वेदिकेकडून करण्यात येत आहे. अशाच घटना सुरू राहिल्यास महाराष्ट्रातूनही त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटकमधील आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून बेळगाव आणि सीमाभागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्ये करून चिथावणी दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. कर्नाटक सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावे अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलतील असेही त्यांनी म्हटले. शंभूराज देसाई यांनी या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दौरा पुढे ढकलला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांसोबत आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
ठाकरे गटाचा राज्य सरकारविरोधात संताप
अशा प्रकारच्या घटनांना भाजप सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. मिंदे सरकारमुळे राज्याच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. राज्यातील सरकार दिल्लीसमोर गुडघे टेकत असल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. कर्नाटकमधून अशा घटना समोर येत असतील तर त्याला प्रत्युत्तर दिले गेल्यास काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.