सत्येच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला मूठमाती अन् बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली : शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Dasara Melava 2022 : बाळासाहेबांनी ज्या पक्षाचा हरमाखोर असा उल्लेख केला, त्यांच्या दावणीला तुम्ही पक्ष बांधला. हे पाहून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील.
Shivsena Dasara Melava 2022 : सत्येच्या हव्यासापोटी हिंतुत्वाच्या विचाराला मूठमाती तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या भूमिकेला, विचारांना तुम्ही तिलांजली दिली. तुम्हाला शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का? बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का? असा टीकेचा बाण एकनाथ शिंदे यांनी उद्दव ठाकरे यांच्यावर सोडला. बीकेसी येथील दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन गद्दारी केली, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
बीकेसी येथील भाषणापूर्वी एकनाथ शिंदे उपस्थित शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत विचारांचे पाईक आणि या सभेला उपस्थित असणाऱ्या तमाम शिवसैनिकांना, राज्यातील तमाम जनतेला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आपल्यासमोर नतमस्तक होतो.. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे -
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असला तरी तुमच्यामधीलच कार्यकर्ता आहे. विशाल जनसमुदाय उसळलाय.. आम्ही घेतलेली हिंदुत्वाची, बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व रक्षणाची भूमिका... म्हणूनच या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अफाट असा जनसागर आलाय... आजच्या सभेनं जनेतेच्या मनातील संभ्रम संपला आहे. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार कोण? असा प्रश्न आता पडणार नाही.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसाठी सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता. मैदान मिळालेही असते. पण या राज्याचा मुख्यमंत्री मी आहे.. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही माझी आहे. मैदान मिळालं नाही म्हणून काय झालं... शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य महत्वाचं आहे.
सत्येच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचाराला मूठमाती तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या भूमिकेला , विचारांना तुम्ही तिलांजली दिली. तुम्हाला शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का? बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का?
हजारो शिवसैनिकांनी घाम-रक्त गाळून पक्ष उभारला. तुम्ही तुमच्या राजकीय, वैयक्तिक फायद्यासाठी महत्वांक्षासाठी पक्ष गहान टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहान टाकला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवायला लागलात. तुम्ही जनतेशी बेईमानी केली.
बाळासाहेबांनी ज्या पक्षाचा हरमाखोर असा उल्लेख केला, त्यांच्या दावणीला तुम्ही पक्ष बांधला. हे पाहून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील. त्यामुळेच आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका जाहिरपणे घेतली. लपूनछपून घेतली नाही. मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतोय, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रेमाचा वर्षाव का होतोय? आम्ही चुकलो असतो, आम्ही बेईमानी केली असती. तर तुम्ही मोठ्या संख्येनं येथे उपस्थित झाला असतात का? आम्ही जे केले ते राज्याच्या हितासाठी, शिवसेनेसाठी केले.
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची.. ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आणि तुम्हा तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करुन शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं आहे.