टोल वसुलीला स्थगिती देऊनही सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेचं आंदोलन
तळकोकणातील ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गवासियांना टोल माफी मिळावी यासाठी शिवसेनेने आज आंदोलन केलं. टोल वसुलीला स्थगिती असतानाही शिवसेनेने आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली जवळील ओसरगाव टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली सुरु होणार होती. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर आजपासून सुरु होणाऱ्या टोल वसुलीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र स्थगिती दिल्यानंतर सुध्दा आज शिवसेनेने टोलनाक्यावर आंदोलन केलं. या आंदोलनात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार वैभव नाईक, शिवसनेचे नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्ते यावेळी ओसरगाव टोलनाक्यावर उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाका सुरु झाल्यास तीव्र आंदोलन करु, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली. हा महामार्ग केंद्राच्या अखत्यारित असून महामार्गाचं काम सुरु असताना ठेकेदाराला कोणी पाठिशी घातलं हे जनतेला माहित आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रस्त्यांसंदर्भात किती बैठका घेतल्या, महामार्गाच्या जमिनी गेल्या त्यासंदर्भात काय भूमिका घेतली. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेंनी या टोल संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, असं वैभव नाईक म्हणाले.
बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कायम प्रेम केलं. इथल्या सगळ्यांना आमदार ते अगदी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. अशा बाळासाहेबांचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. अर्थातच या हायवे प्राधिकरण केंद्राच्या अत्याराखाली येतो. त्यामुळे केंद्राने महामार्गाच्या जागे संदर्भात जे निवाडे आहेत ते लवकर करावेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचा आढावा घ्यावा. MH 07 ला या टोलनाक्या पूर्णतः टोलमाफी द्यावी. अन्यथा उग्र स्वरुपात आंदोलन होऊ नये, असं वाटत असेल तर जिल्हावासियांना टोल माफी द्यावी. शांत सिंधुदुर्ग अशांत करु नका, जिल्हावासियांना टोलचा भुर्दंड घालू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय हे ओरोसला आहे. त्यामुळे मुख्यालयात जाताना ये जा करताना हा भुर्दंड आहे. त्यामुळे टोल माफी झालीच पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
सिंधुदुर्गवासियांना जोपर्यंत टोल माफी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचं अजूनही बरंच काम बाकी आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करु नये. महामार्गाला ज्या लोकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या त्यांना मोबदला दिला पाहिजे अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन छेडेल, असं पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर म्हणाले.
संबंधित बातम्या
कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली, राजकीय पक्ष आक्रमक
सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरील टोलवसुली तूर्त स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच निर्णय