(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो, बावनकुळेंचा 'तो' व्हिडिओ बडगुजरांनी दिला नाही' : संजय राऊत
मुंबईतील अनेक वर्षाची अस्वच्छता साफ करायची म्हणत ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर 2024 ला कोणाची घाण साफ होतेय हे समजेल, म्हणत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर पलटवार केलाय.
नाशिक : सलीम कुत्तासोबतची (Salim Kutta) पार्टी भाजप (BJP) पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा आरोप शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांनी हा आरोप केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा (Chandrashekhar Bawankule) व्हिडीओ बडगुजर यांनी दिलेला नाही. मकाऊचा व्हिडीओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई करण्यात आल्याची शक्यता आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, बावनकुळेंच्या व्हिडीओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. संघ परिवार विशेषतः नागपूरवाल्यांना माहिती आहे की तो व्हिडीओ कसा आला आहे.
भाजप आमदार नितेश राणेंवर संजय राऊतांचा निशाणा
सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचे आयोजन भाजप पदाधिकाऱ्याने केले होते. व्यंकटेश मोरेच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा... तो एवढा बॉम्बस्फोटामधला भयंकर गुन्हेगार होता तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडले. याचा तपास भाजपने करावे आणि मग आमच्याकडे बोट दाखवा. आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर आपली परंपरा आहे. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतःकडे बघावं, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर पलटवार
मुंबई महानगरपालिकेकडून आयोजीत स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करण्यात आली. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून दुसऱ्या टप्प्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील अनेक वर्षाची अस्वच्छता साफ करायची म्हणत ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर 2024 ला कोणाची घाण साफ होतेय हे समजेल, म्हणत राऊतांनी शिंदेंवर पलटवार केलाय.
पंचवटी हीच आमच्यासाठी अयोध्या : संजय राऊत
राममंदिर उद्घाटन आहे तेव्हाच नाशिकमध्ये आमचे अधिवेशन आहे. आमच्यासाठी पंचवटी हीच अयोध्या आहे. मोदीपेक्षा अयोध्येत आम्ही जास्त गेलो आहे, मोदी पंतप्रधान झाल्यावर अयोध्येला गेले. आम्ही आंदोलनात गेलो आहे, खटल्यात मी स्वतः आरोपी आहे, आम्हाला अयोध्या नवीन नाही. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर झाले. आधी अडवणींना आमंत्रण द्या, त्यांनी रथयात्रा काढली होती. रामाचे आंदोलन पुढे नेले, त्यांच्यामुळे हे सर्व प्रधानमंत्री, गृहमंत्री, मंत्री झाले आधी त्यांना बोलवा, असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
मुंबईकडे कधी अन् कोठून निघणार, जरांगेंनी सांगितला आझाद मैदानावरील उपोषणाचा संपूर्ण 'प्लॅन'