Sanjay Raut : संजय राऊतांना जामीन अन् कोर्टात टाळ्यांचा कडकडाट, वाचा नेमकं काय घडलं?
खासदार संजय राऊत यांना जामीन मिळताच कोर्टात देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळालं. कोर्टात पहिलांदाच असे चित्र पाहायला मिळालं आहे.
Sanjay Raut Bail Granted : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यानंतर ठाकरे गटामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच कोर्टात देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळालं. कोर्टात पहिलांदाच असे चित्र पाहायला मिळालं आहे.
तब्बल 100 दिवसानंतर राऊतांना जामीन मंजूर
संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, राऊतांना जामीन मिळताच कोर्टात आज वेगळेच वातावरण पाहायला मिळालं. जामीन मिळताच कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पाहायला मिळालं.
कोर्टात नेमकं काय घडलं
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र, कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळं किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी तीन वाजता न्यायालय निकाल देणार आहे.
काय आहे पत्रचाळ प्रकरण ?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.