(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, 10 जानेवारीला लागणार निकाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रेचा निकालाचा (MLA Disqualification) मुहूर्त ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालाचा (MLA Disqualification) मुहूर्त ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य होते.
विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहे. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. शिवसेनेतल्या आमदार अपात्रतेवर चार महिने सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीला महत्त्वाचा निकाल देणार आहेत.. त्यामुळे नार्वेकरांचा काय फैसला येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याचीही माहिती आहे. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी 7 जानेवारीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे.
राहुल नार्वेकर काय निकाल देणार?
आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याचीही माहिती आहे. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी 7 जानेवारीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे. आपआपली केस अधिक मजबूत करण्यासाठी त्यानुसार दोन्ही गटाच्या आमदारांनी साक्ष दिली. यानंतर उलट तपासणी दरम्यानह आपली भूमिका कायद्याला धरून होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
राहुल नार्वेकर-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी (7 जानेवारी 2024) वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.