Sanjay Shirsat : 'सुनावणीत गोल गोल उत्तरं देताना प्रभूंची दमछाक झाली', संजय शिरसाठ स्पष्टचं म्हणाले
Shiv Sena MLA Disqualification : आम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हीप मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलाय. दरम्यान शिवसेनेच्या आमदार अपात्रेतवर पुढील सुनावणी ही मंगळवारी होणार आहे.
मुंबई : आजच्या सुनावणीत 21 जून रोजी जो व्हीप बजावला होता, त्यावर प्रभूंना प्रश्न विचारण्यात आले, परंतु त्यांची गोल गोल उत्तरं देताना दमछाख झाली, असं म्हणत संजय शिरसाठांनी (Sanjay Shirsat) सुनील प्रभूंवर (Sunil Prabhu) हल्लाबोल केला. सर्वांना व्हीप हा व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आला होता, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. पण आमच्यापर्यंत हा व्हीप पोहचलाच नसल्याचा दावा संजय शिरसाठांनी केलाय.
त्यांनी जे पुरावे सादर केले ते समाधानकारक नव्हते. त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये विरोधाभास दिसत होता, असा दावा देखील संजय शिरसाठ यांनी केलाय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष, चिन्ह, आमदार अपात्रता अशा अनेक मुद्द्यांवर सुनावणी सुरु आहे. त्यातच आमदार अपात्रेतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही मंगळवार म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
संजय शिरसाठांनी नेमकं काय म्हटलं ?
सुनील प्रभूंनी वेगवेगळे स्टेटमेंट विधानसभा अध्यक्षांसमोर देण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्या प्रश्नांच्या उत्तरांची व्याप्ती वाढण्यासाठी देखील केविलवाणा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. व्हीप बजावण्याचा जो प्रकार होता, त्याबाबत जो खुलासा त्यांनी दिला तो काही समाधानकारक वाटला नाही, असं सुनील प्रभूंनी म्हटलं. दरम्यान ठाकरे गटाकडून मेल आणि व्हॉट्सअपद्वारे व्हीप पाठवण्यात आलं असल्याचा दावा केला गेलाय. पण आमच्यापर्यंत असा कोणतचं व्हीप पोहचलं नसल्याचं संजय शिरसाठांनी यावेळी म्हटलं.