शिर्डीत शिवसेनेला लोकसभेचा उमेदवार मिळाला का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं
shiv sena : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. लोखंडे यांनी शिंदे गटाची वाट धरताच त्यांना पर्याय म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
शिर्डी : शिवसेनेच्या 40 आमदारां पाठोपाठ 12 खासदारांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांना धक्का दिलाय. 12 खासदारांमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सदाशिव लोखंडे यांचा ही समावेश आहे. मात्र, लोखंडे यांनी शिंदे गटाची वाट धरताच त्यांना पर्याय म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. शिर्डी येथे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमात घोलप मंचावर येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत घोलप यांचं स्वागत केल्याने शिवसेनेला लोखंडे यांना पर्याय मिळाल्याची चर्चा सुरू झालीय.
शिवसेनेच्या 12 खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या समोर शिवसंवाद मेळाव्यावेळी लोखंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा लोखंडे यांच्या विरोधात 2019 ला नाराजी असताना आम्ही उमेदवारी दिली आणि तुम्ही निवडून दिले तरी त्यांनी आज गद्दारी केल्याची टीका केलीय.
आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असताना शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्या स्थळी एंट्री झाली. यावेळी शिवसैनिकांनी भावी खासदार असा उल्लेख करत घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे यांनी बबनराव घोलप यांचा हात हातात घेत एक प्रकारे भावी उमेदवार निश्चित झाल्याचे संकेत दिले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी मात्र लगेच उमेदवारी देणे माझ्या हातात नाही असं स्पष्ट केलं.
मेळाव्यानंतर घोलप यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "साईबाबांनी माझी वाट मोकळी करून दिलीय. पक्षाचा आदेश आल्यास मला कर्तव्य करायचं ते मी करेन. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असून 54 वर्ष सेनेत आहे. आदेश पाळणे माझा धर्म असून मला जे काम मिळेल ते मी करत राहीन, असे घोलप यांनी म्हटले आहे.
2019 ला बबनराव घोलप यांची शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र निवडणुकीच्या 17 दिवस अगोदर न्यायालयीन अडचणीमुळे घोलप यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे ऐनवेळी सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि अवघ्या 17 दिवसात लोखंडे कोणताही जनसंपर्क नसताना खासदार झाले. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या समोर शिवसैनिकांनी घोलप यांच्या समर्थनार्थ केलेली घोषणाबाजी पाहता बबनराव घोलप पुढचे उमेदवार असल्यास निवडणूक चुरशीची होईल अशी चर्चा सुरू आहे.