शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा पत्ता कट होणार? प्रगती पुस्तकात दोघे नापास, तर पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Maharashtra Cabinet Minister : शिवसेनेमध्ये यंदा कठोर निकष लावून मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच मंत्रिपदाच्या यादीवर अंतिम चर्चा ही दिल्लीत होणार असल्याचीही चर्चा आहे.
मुंबई : आगामी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोन मंत्र्याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं असून त्यानुसार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचं मंत्रिपद हुकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर पाच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 12 ते 13 रिपदं मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकरांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते अशीही चर्चा आहे. त्याचवेळी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मात्र मंत्रिपदापासून मुकावं लागणार असल्याची चर्चा आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा होणार असल्याचंही बोललं जात आहे.
शिवसेनेत निकष लावून मंत्रिपदं?
शिवसेनेच्या मंत्रिमंडळात यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. यावेळेस एकनाथ शिंदे कठोर निकष लावून मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जे पात्र असतील, पक्ष संघटना वाढवतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशीही चर्चा आहे.
गेल्या अडीच वर्षात ज्यांना मंत्री पद किंवा महत्त्वाची खाती दिली त्यांनी दोन्ही निवडणुकीत कसे काम केले? पक्ष संघटनेच्या वाढीसाठी काय योगदान दिले? निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली? फक्त स्वतःचा मतदारसंघ सांभाळला की इतर ठिकाणी फिरले? असे सर्व निकष लावले जाणार असल्याची माहिती आहे. केवळ जेष्ठतेच्या मुद्द्यावर किंवा बंडात साथ दिलेल्या मुद्द्यावर यावेळी मंत्रिपद दिले जाणार नाही अशी माहिती आहे.
मंत्रिपदाचा संभाव्य फॉर्म्युला
राज्य मंत्रिमंडळात भाजप 18 ते 20 मंत्रिपदं आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 12 ते 13 मंत्रिपदं मिळणार असल्याचं समजतंय. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही बातमी वाचा :