Shiv Jayanti : शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत गदारोळ; मुनगंटीवार आणि अजितदादांमध्ये खडाजंगी
Shiv Jayanti : तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवजयंती साजरी केल्याने सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत आज जोरदार खडाजंगी झाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिले.
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. मात्र, राज्याचे अधिकारी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार असल्याचे म्हणत आहेत. तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यावर विचार करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उपस्थित केला. अजित पवार यांनी म्हटले की, शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये. याआधी आघाडी सरकारच्या काळात संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630 निश्चित करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे 19 फेब्रुवारी रोजी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाच्या आमदारांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विधीमंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जाऊन अभिवादन करावे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवजयंती साजरी
तिथीप्रमाणे आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शपथ दिली. राज्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: