Shirdi Sai Baba | साई चरित्रामधील जन्मस्थळाचा उल्लेख असलेली आवृत्ती गायब
साई चरित्रामधील जन्मस्थळाचा उल्लेख असलेली आवृत्ती गायब असल्याची माहिती मिळाली आहे. या आवृत्तीमध्ये साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा उल्लेख आहे, असा दावा पाथरीकरांनी केला आहे.
अहमदनगर : जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे आज शिर्डी बंद आंदोलन सुरु आहे.
पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थाननं 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावानं करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलं आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचादेखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे.
1972 ते 75 मध्ये साईचरित्राची आठवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर पाथरी संस्थानचे विश्वस्त विश्वासराव खेर आणि सीताराम धानू हे द्वयी शिर्डी संस्थानचेही विश्वस्त होते. त्यामुळे सदर प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. याबाबत संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे म्हणाले की, आठवी आवृत्ती गायब आहे, याबाबत आम्हाला आताच माहिती मिळाली आहे, आम्ही यावर चौकशी करणार आहोत.
शिर्डी संस्थानने साईचरित्राच्या आतापर्यंत 36 आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. त्यापैकी नेमकी आठवी आवृत्ती मंदिर संस्थानच्या दप्तरांमधून गहाळ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे इतक्या आवृत्त्यांपैकी केवळ आठवी आवृत्तीच कशी गायब झाली? असा सवाल पाथरीकर उपस्थित करत आहेत.
व्हिडीओ पाहा
काय आहे वादामागील कारण? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत 100 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादाला तोंड फुटले. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
'पाथरी'करांकडे असलेले साई जन्मभूमीबाबतचे महत्वाचे पुरावे कोणते?