मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याबाबत साशंक : शरद पवार
शरद पवार यांनी गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हौतात्म्याचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असंही ते या वेळी म्हणाले.

सातारा : राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेले आहे ते न्यायालयात किती टिकेल? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगत तरतुदीतील मुद्दे सरकारने लक्षात घेतले नसावेत, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
यावेळी त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी हेच देशाचे नेतृत्व करण्यास योग्य आहेत, असे सांगत गांधी कुटुंबीयांचे कौतुक केले. शरद पवार यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात मोदी सरकारवर तोफ डागत गांधी कुटुंबावर मोदींकडून जी टीका होत आहे, त्याला उत्तर दिले.
शरद पवार यांनी गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हौतात्म्याचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक केले. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असंही ते या वेळी म्हणाले. दुसरीकडे, बारामतीत बोलताना मात्र, 'देशात पर्यायी आघाडी न करता राज्यपातळीवर आघाडी करणार', असं ते म्हणाले. "आघाडी करताना कुठलाही नवा चेहरा समोर करणार नाही", असंही ते म्हणाले. त्यांच्या या दोन्ही विधानांमुळे लोकांनी वेगवेगळे तर्क-वितर्क काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे याबद्दल आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.























