Sharad Pawar Meets Amit Shah : शरद पवार आज अमित शाहांना भेटण्याची शक्यता, इथेनॉल बंदीच्या निर्णयाबाबत चर्चा होणार
Sharad Pawar Meets Amit Shah : राज्यात निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे.
नवी दिल्ली : शेती प्रश्नाच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. कांदा उत्पादक (onion Farmers) शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्या संदर्भात भेट घेऊन साखर कारखानदारांची समस्या मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या संदर्भात भेट घेत साखर कारखानदारांची समस्या मांडणार आहे. या निर्णयाचा मोठा फटका हा साखर कारखादारांना बसणार आहे. त्या संदर्भात भेट घेत निवेदन देणार आहे.राजेश टोपे देखील अमित शहांच्या भेटीसाठी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. अमित शाहांसोबत कालच बैठक होणार होती. मात्र लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेल्या गदारोळामुळे काल भेट झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार आज अमित शाहांची भेट घेणार
राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. आज (15 डिसेंबरल) अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेणार आहे. रात्री 10 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली.
सरकारचा निर्णय काय?
सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. दरम्यान, भारत सरकार साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येताच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखरेचे भाव खाली येण्याची शक्यता आहे.