''शरद पवार अन् जरांगेंची समांतर लाईन, ते निवडणूक लढवू शकत नाहीत, हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या''
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी काढलेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा आज अहमदनगरच्या जामखेडमध्ये दाखल झाली आहे.
![''शरद पवार अन् जरांगेंची समांतर लाईन, ते निवडणूक लढवू शकत नाहीत, हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या'' Sharad Pawar and Jarange Parallel line, Mnoj jarange can't contest elections, Says Laxman hake in ahmednagar ''शरद पवार अन् जरांगेंची समांतर लाईन, ते निवडणूक लढवू शकत नाहीत, हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या''](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/24/f01faf7ecbc4eabe6495f3809f20cb0e17218105696361002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 5 व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यातच, जरांगे यांच्याकडून राजकीय भाषा बोलली जात असल्याने भाजप नेत्यांनीही मनोज जरांगे यांना लक्ष्य केलंय. दुसरीकडे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांनी आरक्षणच बचाव जनआक्रोश यात्रेतून आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील हे निवडणूक (Election) लढू शकत नाहीत हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. तसेच, जरांगे व शरद पवार यांची समांतर लाईन असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे, आता मनोज जरांगे यांनी पुढील भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी काढलेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा आज अहमदनगरच्या जामखेडमध्ये दाखल झाली आहे. या जनआक्रोश यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून ओबीसींचा हा जनाक्रोश आम्ही नेटाने सरकारपर्यंत पोहचणार आहोत. मुख्यमंत्री शिंदेंनी फक्त मराठा समाजाचे लाड पुरवण्याचे काम सुरू केले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर जातीयवादी असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. तर, लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्यावर भाष्य केलं. मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करत विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहे. त्यावर, जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरावी, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवर शिव्या घालाव्यात, ही काही निवडणूक लढवण्याची साधन आहेत का? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. मात्र, मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, हे मी पेपरवर लिहून देतो, असेही हाकेंनी म्हटले.
मनोज जरांगे यांची लढाई आरक्षणाची नसून वर्चस्वाची आहे. जरांगे पाटील हे निवडणूक लढू शकत नाहीत, हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या अशा शब्दात हाके यांनी जरांगे पाटीलांवर निशाणा साधला. ज्या मागण्या मान्य होणार नाहीत, अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. त्यांना आणि त्यांना सल्ला देणाऱ्यांना दोघांनाही माहित आहे, महापुरुषांच्या प्रतिमेसमोर बसून शिवराळ भाषा वापरणारा हा माणूस तारीख पे तारीख देऊ शकतो, याशिवाय जरांगे दुसरे काही करू शकत नाहीत. निवडणुकीमध्ये कोणाविरुद्ध प्रचार करतात हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करेल, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेल देखील नसल्याचे हाके यांनी म्हटले.
जरांगे अन् शरद पवारांची समांतर लाईन
मनोज जरांगे यांना ओबीसी मध्ये फूट पाडायची आहे, त्यांना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे, शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. ओबीसीमध्ये साडे तीन टक्के आरक्षण धनगर समाजाला मिळतं. सर्वाधिक वाटा असतानाही आम्ही ओबीसीच्या आरक्षणाबाबत का लढू नये, असा सवाल उपस्थित करत असतानाच ओबीसी आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र जरांगेचं असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)