कुणाच्यातरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : शंभूराज देसाई
Maratha Reservation : मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबई : कुणाच्यातरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही, ओबीसींच्या आरक्षणातून कुठलंही आरक्षण काढलं जाणार नाही, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली. मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात या बेठकीत चर्चा करण्यात आली. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, मुंबई, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करा अशा मागण्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसमोर केल्या. मराठा समाजाच्या मागण्यांवर उद्यापासून अधिक गतीनं काम सुरु करा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली.
ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही
शंभूराज देसाई म्हणाले की, शिष्टमंडळाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने गुन्हे मागे घेणं, मुंबई, हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करणं हे मुद्दे होते. त्यासंदर्भात मी आणि चंद्रकांतदादांनी तात्काळ त्यासंदर्भात कामाला लागावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आहे. हैदराबाद गॅजेट लागू करा, सगेसोयऱ्यांचं नोटिफिकेशन काढा या सगळ्या जरांगेंच्या मागण्याचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढण्यावर चर्चा आहे. ओबीसींच्या आरक्षणातून कुठलंही आरक्षण काढलं जाणार नाही, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही.
शंभूराज देसाई म्हणाले की, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाली. लक्ष्मण हाके देखील आंदोलन करत आहेत. मात्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावलेला नाही. इतर समाजाच्या आरक्षणालाही धक्का लावलेला नाही. मनोज जरांगेंनी प्रकृतीकडे लक्ष द्यावं, त्यांची तब्येतदेखील महत्त्वाची आहे.